बोईसर शहरात सांडपाण्यामुळे आरोग्याची समस्या

बोईसर ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारी केल्यानंतरदेखील कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

डासांचा प्रादुर्भाव, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

पालघर: बोईसर शहरात खोदाराम बाग परिसरात शौचालयाचे सांडपाणी बाहेर उघडय़ावर साचत असल्याने दाट वस्तीच्या परिसरात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. या भागातील अनेकांना डासांच्या प्रादुर्भावामुळे पसरणाऱ्या आजारांची लागण झाली असल्याने बोईसर ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे.

बोईसर- तारापूर मुख्य रस्त्यालगत खोदारामबाग मधील एका मोकळ्या गार्डन प्लॉटमध्ये लगतच्या तीन-चार इमारतींनी व बंगल्यामधील सांडपाणी व शौचालयाचे पाणी साठवण्यासाठी टाकी बांधण्यात आली होती. या टाकीमध्ये सांडपाण्याचा उपसा होत नसल्याने गेल्या महिन्याभरापासून या टाकीमधील सांडपाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे या गार्डन प्लॉटमध्ये पाण्याचे डबके तयार झाले आहे.

या सांडपाण्यात दुर्गंधीचे वातावरण पसरले असून त्यामध्ये डासांची पैदास होत असल्याने मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजारांचा प्रसार होत असून लगतच्या इमारतींमध्ये अनेक नागरिकांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले आहे. विशेष म्हणजे या परिसरात काही नामांकित बँका, शॉपिंग कॉम्प्लेक्स, शाळा, दवाखाने व रुग्णालय असून येथे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात रोगराई पसरणार अशी भीती व्यक्त होत आहे.

याबाबत बोईसर ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारी केल्यानंतरदेखील कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास परिसरातील कूपनलिकांमधील पाणी दूषित होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात बोईसरचे ग्राम विकास अधिकारी कमलेश संखे यांच्याशी संपर्क साधला असता खोदाराम येथील गार्डन प्लॉटमधील सांडपाण्याचा उपसा करण्यासाठी तातडीने उपाययोजना अमलात आणल्या जातील असे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Health problems sewage city boisar ssh