पालघर : पालघर शहरात सफाई करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी पगार वाढ संदर्भात दिलेल्या आश्वासनांची पूर्तना न केल्याने संप पुकारला असून त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नवीन ठेकेदाराकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पगार वाढ होईल असे नवीन कचरा ठेक्या संदर्भात तत्कालीन नगराध्यक्ष यांनी केलेले वक्तव्य फोल ठरले आहे. यामुळे शहरातील १९ कचरा उसळणाऱ्या घंटा गाड्या बंद ठेवण्यात आले असून त्यामुळे रस्ते व गटार सफाईची कामे देखील थांबली आहेत.

जून २०२३ मध्ये पालघर नगरपरिषदेने कचरा ठेक्याचे नूतनीकरण करून त्यामध्ये अमुल आग्रह बदल केले. यामुळे शहरात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना २२ ते २५ हजार रुपये पगार मिळेल असे वक्तव्य तत्कालीन नगराध्यक्ष यांनी या नवीन वाढीव रकमेच्या ठेक्याच्या प्रसंगी केले होते. त्यामुळे पालघर नगर परिषदेला दर महिन्याला १७- २० लाख रुपयांचा कचरा उचलल्यावर होणारा खर्च ४५ ते ५० लाख रुपयांवर पोहोचला होता.

प्रत्यक्षात जुन्या ठेकेदाराकडे काम करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना हातामध्ये सुमारे साडेबारा हजार रुपये मिळत होते. मात्र नवीन ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला इतर करांची कपात करून १४,७०० रुपये मिळत असल्याने आपल्याला पगार वाढीव मिळावा अशी मागणी गेल्या महिन्यात केली होती. गेल्या महिन्यात देखील एक दिवसाचा लाक्षणिक संप या कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांनी केला असता पुढील महिन्यापासून वाढीव पगार मिळेल असे त्यांना आश्वासन करण्यात आले होते. मात्र काल देण्यात आलेल्या पगारामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न झाल्याने पालघर शहरात काम करणाऱ्या १७५ ते २०० कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून संप पुकारला.

काल सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड या नगर परिषदेला भेट देणार असल्याने रस्त्याकडेला उभ ठेवण्यात येणाऱ्या घंटागाड्या आज ढवळे रुग्णालयाच्या परिसरात ठेवण्यात आल्या होत्या. आज सकाळपासून शहरामध्ये सफाई व कचरा उचलण्याचे कार्य बंद पडल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात संबंधित कचरा ठेकेदारांशी संपर्क साधला असता यापूर्वी कर्मचारी युनियनच्या प्रतिनिधी सोबत झालेल्या चर्चेनुसार पगार नियमितपणे दिला जात असल्याचे व आवश्यक शासकीय नियमांचे पालन केले जात असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात दिवसभरात चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.