गतवर्षीपेक्षा सव्वा पाचशे मिलिमीटर अधिक पावसाची नोंद

पालघर :  मे महिन्याच्या मध्यावर सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत राहिल्याने जिल्ह्यात सरासरीच्या ११९ टक्के पर्जन्यमान झाले आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा सव्वा पाचशे मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने जून व जुलै महिन्यात जोर कायम ठेवला होता. ऑगस्ट महिन्याच्या आरंभी जिल्ह्यात १६०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ३७५ मिलिमीटर, सप्टेंबर ७८४  तर ऑक्टोबरमध्ये सरासरी ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात अनियमितपणे पाऊस पडत असल्यामुळे भातशेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र यंदा सातत्यपूर्ण पाऊस झाल्याने भात पिकाची वाढ जोमाने होऊन पिकावरील कीटक व रोगाचे प्रमाणदेखील नियंत्रणात राहिले .  बंगाल महासागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच परतीच्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने तयार पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  किनारपट्टीच्या भागातील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.    डहाणू तालुक्यात सर्वाधिक सरासरीच्या १४५ टक्के पाऊस झाला असून तलासरी तालुक्यात १३५ टक्के, जव्हार तालुक्यात ११९ टक्के, पालघर तालुक्यात ११३ टक्के, विक्रमगड तालुक्यात १०५ टक्के पाऊस नोंदविण्यात आला तर वसई तालुक्यात ९९.४ टक्के व वाडा तालुक्यात ९३.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत पावसाने शंभर इंचाची मर्यादा ओलांडली असून सरासरीपेक्षा अधिक असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रब्बी पिकाला विलंब

लांबलेल्या पावसामुळे व परतीच्या पावसामुळे जुनी भात कापणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील लागवडीला काहीशा प्रमाणात विलंब झाला आहे, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.