पालघर : सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व विशेषत: गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने हळव्या व निमगरव्या भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी युरियासह अन्य खतांचा वापर टाळावा, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

जिल्ह्यामध्ये सुमारे ७८ हजार हेक्टर क्षेत्रफळावर भात पिकाची लागवड होते. त्यापैकी ९० दिवसांपूर्वी येणारे हळवे तसेच ९० ते १२० दिवसांचे असणारे निमगरव्या पिकाची प्रत्येकी सुमारे ३० टक्के लागवड केली जाते, तर १३० दिवसांपेक्षा अधिक कालावधीत पिकणारे निमगरव्या भात पिकाची जिल्ह्यात सुमारे ४० टक्के लागवड होत असल्याचे दिसून आले आहे. हळव्या भात पिकाला फुलोरा येऊन त्याचे परागकण होऊन दुधाळ पदार्थाने दाणा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसामुळे परागकण वाहून जाऊन दाणा व्यवस्थित भरत नाही. पिलजचे प्रमाण खूप वाढते. उशिराने लागवड केलेल्या हळव्या व निमगरव्या भात पिकाला अनेक ठिकाणी फुलोरा आला आहे. मात्र तो मुसळधार पावसामुळे धुऊन गेला असण्याची शक्यता आहे. गरव्या भात पिकाला सध्या तरी धोका नसल्याचे कृषीतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

एकंदर वातावरणामुळे कीड व तुडतुडय़ा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  शेतकऱ्यांनी फवारणी हाती घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर झालेल्या पावसामुळे इतर पिकांना व फुलझाडांना पोषक वातावरण असल्याचे  विभागाचे म्हणणे आहे. अजूनपर्यंत  शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची माहिती विभागाला कळवली नसल्याचे सांगण्यात आले.

सद्य:स्थितीत खतामुळे पिकांच्या नुकसानीची भीती

मुसळधार पाऊस झाल्याने शेतात अनेक ठिकाणी पाणी साचले असून अशा परिस्थितीत भात पिकाला युरिया किंवा अन्य खत देऊ नये असा  सल्ला कृषी विभागाने दिला आहे. खतामुळे पीक वाढ जोर घेईल व आगामी काळात ते कमकुवत होऊन भात पीक झुकण्याची किंवा तुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय सदय:स्थितीत खत दिल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची अधिक भीती असल्याचे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चिकू बागायतदारांवर अस्मानी संकट

पावसाळय़ात चिकूवर आलेल्या विशिष्ट रोगामुळे बागायतदार संकटात असताना सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसामुळे हे संकट अधिक गहन झाले आहे. सध्या तुरळक प्रमाणात उपलब्ध होणारा चिकू नाहीसा झाला असून आगामी किमान चार ते पाच महिने अशीच परिस्थिती राहील अशी भीती  कृषिभूषण विनायक बारी यांनी व्यक्त केली आहे. सरकारने तातडीने लक्ष द्यावे तसेच डहाणूत चिकू संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.