बोईसर : पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत अर्धवेळ कंत्राटी मदतनीसांना  सुमारे पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. अतिशय तुटपुंज्या मानधनावर जोखमीचे काम करणाऱ्या मदतनीसांना नियमित मानधन मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पाठपुरावा करून सर्व थकीत मानधन तातडीने देण्याची मागणी मदतनीसानी केली आहे.

पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत ४६ आरोग्य केंद्र आणि ३०४ उपकेंद्र कार्यरत आहेत. उपकेंद्रातून पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे जिल्ह्याच्या अतीदुर्गम ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा फायदा होतो. मात्र उपकेंद्रांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि मदतनीस यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

जिल्ह्यातील ३०४ उपकेंद्रांची दैनंदिन साफसफाई आणि प्रसूतीवेळी गरोदर माता व नवजात अर्भकाची काळजी व स्वच्छता करण्याचे काम अंशकालीन मदतनीस करतात. मात्र कंत्राटी नेमणूक असलेल्या मदतनीसांचे जून महिन्यापासूनचे मानधन थकीत असल्याची बाब समोर आली आहे. अंशकालीन मदतनीसांना महिना तीन हजार रुपये इतक्या अतिशय तुटपुंज्या मानधनावर जोखमीचे काम करावे लागते. मात्र तुटपुंजे मानधन देखील नियमित  मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तुटपुंजे मानधन वाढवून मिळावे व इतर प्रलंबित प्रश्नांकरिता मदतनीसांनी  जुलै महिन्यात कामबंद आंदोलन केले. आंदोलनादरम्यान शासनाकडून मागण्या मान्य करण्याचे  आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र त्यानंतर देखील थकीत मानधनाचा प्रश्न अजूनही कायम आहे.

पालघर जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत २६५ अंशकालीन मदतनीसांना जून महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. याप्रकरणी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे दाद मागून देखील प्रश्न सुटलेला नाही. – कविता पाटील, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ

जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रात कंत्राटी तत्वावर कार्यरत अंशकालीन मदतनीसानी मानधन वाढ आणि इतर मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले होते. फक्त या आंदोलनात सहभागी मदतनीसाचे मानधन देण्यात आलेले नाही.  मानधन वाढ करण्याबाबत आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. – डॉ. संतोष चौधरी जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर