पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला केंद्र सरकारकडून यश मिळाले आहे. राष्ट्रीय महामार्ग कायद्यांतर्गत संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यावर आता कोणताही प्राप्तिकर (इनकम टॅक्स) लागणार नाही, तसेच त्यातून कोणताही टीडीएस कापला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केला आहे.

खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी २२ मार्च रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची या गंभीर विषयासंदर्भात भेट घेतली होती. देशातील हजारो शेतकरी आणि भूधारकांच्या जमिनी मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे सारख्या राष्ट्रीय महामार्गांसाठी सक्तीने संपादित केल्या जातात. मात्र, ‘RFCTLARR Act, 2013’ नुसार मिळणाऱ्या मोबदल्याला प्राप्तिकरातून सूट असताना, ‘राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६’ अंतर्गत मिळणाऱ्या मोबदल्यावर कर आकारला जात होता. या असमानतेमुळे प्रकल्पग्रस्तांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे आणि अन्याय होत असल्याचे डॉ. सवरा यांनी पुराव्यांसह नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या या आग्रही मागणीची तत्काळ दखल घेत, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ३० मार्च रोजी एक अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. या नव्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग कायद्यांतर्गत मिळालेला भूसंपादन मोबदला प्राप्तिकरातून पूर्णपणे मुक्त करण्यात आला आहे. मोबदल्याच्या रकमेतून आता कोणताही टीडीएस कापला जाणार नाही. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड आणि सर्व भूसंपादन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशभरातील आणि विशेषतः पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकरी, भूधारक व प्रकल्पग्रस्तांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या घामाच्या पैशावर कर आकारला जाऊ नये, यासाठी आपण हा लढा उभारला होता. त्याला आज यश आले आहे. या जनहिताच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. जनतेच्या हक्कासाठी आपला हा लढा असाच सुरू राहील. -डॉ. हेमंत विष्णू सवरा, खासदार