मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच

निखिल मेस्त्री

पालघर : अपूर्ण सेवा रस्ते, अनधिकृत वळणे, वाहिन्यांची शिस्त न पाळणे, दुतर्फा पार्किंग यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत. रविवारी सायंकाळी मनोर पोलीस ठाणे हद्दीमध्ये नांदगाव सतीमाता हॉटेल समोर घडलेला अपघात हा अशाच कारणांमुळे झाला असून त्यामध्ये चौघांना जीव गमवावा लागला.  तीन दिवसांपूर्वी चारोटी परिसरात एका अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातांना महामार्ग प्राधिकरण कारणीभूत ठरत असल्याचे आरोप होत आहेत.

महामार्गावरील चारोटी-महालक्ष्मी, नांदगाव-चिल्हार येथील सेवा रस्ते अजूनही अपूर्ण आहेत. महामार्गावर मोकाट फिरणारी जनावरे याकडे लक्ष दिले न गेल्याने वाहने जनावरे वाचविण्याच्या नादात अपघाताला सामोरे जात आहेत. महामार्गावर अनेक वेळा वाहनांना आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी एका वाहनाला आग लागून वाहनांमध्ये एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाला होता.

 महामार्गावर अशा घटना घडल्यानंतर प्राधिकरणाच्या नियुक्त केलेल्या यंत्रणेकडून अपघातानंतर पुरवणे आवश्यक असताना ते केले जात नाही. वाहनाला लागलेल्या कोणतीही मदत प्राप्त होत नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह महामार्ग पोलिसांना इतर ठिकाणाहून मदत घेऊन बचावकार्य करावे लागत आहे. प्राधिकरणाकडून नियुक्त केलेल्या यंत्रणेमार्फत रुग्णवाहिका, टोचण करणारे वाहन, क्रेन अशा बाब आगीच्या घटनेत अग्निशमन दलही वेळेत पोहोचत नाही. अपघाताची घटना तक्रार पुस्तिकेत नोंद होऊ नये यासाठी हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप करण्यात येतात. यंत्रांअभवी महामार्गावर नादुरुस्त झालेली वाहने अनेक तास रस्त्यांवर उभी असतात. यामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. महामार्गावर अपघात घडल्यानंतर ठिकठिकाणी मदतकार्य मिळण्यासाठी दूरध्वनी मदत कक्ष उभारलेले आहेत. मात्र तेही नादुरुस्त अवस्थेत आहेत. महामार्गावर असलेले हॉटेल, ढाबे या ठिकाणी जाण्यासाठी अनधिकृत वळणे याकडे लक्ष न दिल्यामुळे या वळणाच्या ठिकाणी मोठे अपघात घडल्याचे अनेक घटना आहेत. त्यानंतरही महामार्ग प्रशासन हे वळण रस्ते बंद करत नाहीत. या उलट धाबे, हॉटेल्स यांना अभय दिले जात आहे, असे येथे सांगितले जाते.

 महामार्ग प्राधिकरण या घटनांकडे दुर्लक्ष करत असेल तर जिल्ह्य़ाची रस्ते दुर्घटना समिती बैठकीमध्ये हे विषय उपस्थित होणे आवश्यक आहे. परंतु समितीमध्ये यावर कोणतीही चर्चा केली जात नाही. हेच या अपघातांवरून दिसून येते. त्यामुळे या सर्वाना महामार्ग प्राधिकरण कारणीभूत असल्याचे आरोप विविध स्तरातून होत आहे.

पाच वर्षांतील अपघात

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर  गेल्या पाच वर्षांत मेंढवन-आच्छाड रस्त्यावर मेंढवन भागात ४२१ अपघात झाले असून यामध्ये २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर २८९ प्रवासी जखमी झाले. तसेच चारोटी या ठिकाणीही ३०२ अपघातामध्ये  ३२ मृत्यू झाले तर २८५ चालक, प्रवासी जखमी झाले आहेत. धानिवरी या ठिकाणीही १२० अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू तर ११० जण जखमी झाले आहेत. आंबोली-तलासरी परिसरातसुद्धा १६४ अपघातामध्ये ३४ जणांचा मृत्यू व १२८ जण जखमी झाले आहेत.

अनधिकृत वळणे अपूर्ण सेवा रस्ते दुतर्फा पार्किंग व इतर कारणांसाठी चर्चांवर चर्चा व बैठका होत आहेत मात्र हे सर्व बंद कधी होणार हे अनुत्तरितच आहेत प्राधिकरणामार्फत योग्य ती सेवा पुरवली जात नसल्यामुळे तसेच त्यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडत आहेत.

हरबन्स नन्नाडे, प्रवक्ता, राष्ट्रीय वाहन चालक मालक महासंघ