दुभाजक तोडून हॉटेल, ढाब्यांसाठी बेकायदा प्रवेशमार्ग

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गलगत सातिवली ते आच्छाड दरम्यान बेकायदा हॉटेल तसेच ढाबेमालकांनी दुभाजक तोडून स्वत:च्या फायद्यासाठी तयार केलेले वळण अपघाताला आमंत्रण देत आहेत.  या बेकायदा  वळणातून घुसणारी वाहने भरधाव वाहनांना धडक देऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

मस्तान नाका येथे सिमला हॉटेल समोरील बेकायदा तयार केलेल्या धोकादायक वळणावर गुरुवारी एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली होती.  अशा अपघाताच्या घटना अनेकवेळा घडत आहेत. त्यामुळे बेकायदा दुभाजक  वळणे बंद करून अपघाताला आळा घालण्याची नागरिकांचे म्हणणे आहे.  राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे मालकांनी स्वत:च्या फायद्यासाठी  थेट मर्यादा रेषेच्या आतमध्ये तसेच नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे करुन सर्रास उल्लंघन केले आहे.

 राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला खासगी  हॉटेल तसेच ढाबे उभारण्यात आले आहेत. सहा पदरी महामार्ग आणि पोच रस्ता यांच्यामध्ये नैसर्गिक पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या नाल्यांवर खाजगी ढाबे मालकांनी नाला बुजवून त्यामध्ये माती भराव तसेच डांबरीकरण करून वाहनांसाठी पोच रस्ते तयार केले आहेत. ढाबे मालकांनी स्वार्थासाठी राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक तोडून धोकादायक वळणे तयार केली आहेत. त्यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. तर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ते तसेच आरओडब्लूवर काँक्रीटीकरण करुन पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद केले आहेत.  त्यामुळे ढाबे तसेच हॉटेल समोरच  अपघातजन्य ठिकाणे तयार होत आहेत. याविरुद्ध राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अतिक्रमण धारकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दुभाजक तोडून अतिक्रमण करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण होते, याकडे टेन गावातील संदेश गणेशकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला असल्याचे चारोटी विभागाचे महामार्ग पोलीसठी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल रायपुरे यांनी सांगितले.

धोकादायक मार्ग

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर  वराई, हलोली, मस्तान नाका, जव्हार फाटा , नांदगाव, आवंढणी, चील्हार, वाडा खडाकोना, सोमटा, चिंच पाडा, तवा, चारोटि बसवत पाडा, एशियन पेट्रोल पंप, आंबोली, तलासरी, ते अच्छाड दरम्यान  अनेक भागात बेकायदा दुभाजक तोडून वळण मार्ग तयार करण्यात आले आहेत.  मनोर, नांदगाव, चिल्हार, सोमटा, चिंचपाडा, चारोटी आंबोली ते आच्छाड पर्यंत ढाबे मालकांनी पोच रस्त्यासाठी गटारे तसेच नाल्यांवर माती भराव तसेच क्राँक्रीटीकरण करुन नैसर्गिक नाले बंद केले आहेत. परिणामी महामार्गालगत  पावसाचे  पाणी साचून वाहतुकीस धोका निर्माण होत आहे.