मस्तान नाका येथील सेवा रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दापचरी येथील रस्ते काम अर्धवट

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मस्तान नाका येथील सेवा रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. टोल नाका प्रशासन महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांकडून टोल आकारते, या पैशातून सेवा रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, सेवा रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, डांबरीकरण करून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करताना स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते तयार केले आहेत. मात्र सध्या या सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. मस्तान नाका येथील सेवा रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ात पावसाचे पाणी साचते, परिणामी या खड्डय़ांत वाहने आदळून अपघात होत आहेत.

खानीवडा टोलनाका ते चारोटी टोलनाका या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सेवा रस्त्यांवर दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही गावांमध्ये सेवा रस्त्यांचे काम अपुरे आहे, तर काही ठिकाणी रस्त्यांची कामे केली नाहीत, याचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे.

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित सेवा रस्त्यांची कामे पूर्ण करावीत यासाठी ग्रामस्थ राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व टोल नाका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांच्याकडून या मागण्यांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे.