Hirakni rooms bus stations missing Palghar district ysh 95 | Loksatta

बस स्थानकांतील हिरकणी कक्ष गायब, पालघर जिल्ह्यात उघडय़ावरच स्तनदा मातांवर स्तनपान देण्याची वेळ

गेली अनेक वर्षे पालघर जिल्ह्यातील बस स्थानकात असलेले हिरकणी कक्ष सध्या गायब झालेले दिसून येत आहेत.

pg1 women
बस स्थानकांतील हिरकणी कक्ष गायब

रमेश पाटील

वाडा: गेली अनेक वर्षे पालघर जिल्ह्यातील बस स्थानकात असलेले हिरकणी कक्ष सध्या गायब झालेले दिसून येत आहेत. जेथे आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी सूचना फलक नसल्याने हे कक्ष असूनही उपयोगी येत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील स्थानकाच्या अनेक ठिकाणी स्तनदा मातांना अन्य आडोसा शोधून आपल्या बाळाला स्तनपान करावे लागत आहे.

दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हिरकणी कक्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची सर्वत्रच चांगली अंमलबजावणी झाली. ही सुविधा चार ते पाच वर्षे सुस्थितीत सुरू राहिली. त्यानंतर अनेक ठिकाणी पंखा, खिडक्यांना पडदे, तर काही ठिकाणी मातांना बसण्यासाठी खुच्र्याची सुविधा हळूहळू गायब होत गेल्या. अलीकडेच हे कक्षच गायब झाले. डहाणू येथे असलेला हिरकणी कक्ष बस स्थानकात नसल्याने तो शोधून काढणे स्तनदा मातांसाठी कठीण जात आहे.

जव्हार बस स्थानकात हिरकणी कक्ष आहे, मात्र या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. बोईसर बस स्थानकात आजवर हिरकणी कक्ष उभारला गेलेला नाही. या ठिकाणी बस स्थानकाची पक्की इमारत नसल्याने  हिरकणी कक्ष ठेवला गेलेला नसल्याचे येथील आगार प्रमुखांकडून सांगितले. वाडा बस स्थानकातील हिरकणी कक्ष गायब होऊन चार वर्षे झाली आहेत. जिल्हाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बस स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. या ठिकाणी हिरकणी कक्षाची नितांत आवश्यकता आहे.  मात्र बस स्थानकात जागा अपुरी असल्याने हिरकणी कक्ष कुठे करायचा, हा प्रश्न येथील प्रशासनाला पडला आहे.

स्तनदा मातेला प्रवासादरम्यान नि:संकोचपणे व आत्मसन्मानाने बाळाला स्तनपान करता यावे याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने हिरकणी कक्ष तयार केले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होणे हे एसटी प्रशासनाचे अपयश आहे. 

– सुचिता पाटील, नगरसेविका, नगरपंचायत वाडा

हिरकणी कक्षाकडे दुर्लक्ष झाले होते, मात्र नव्याने पुन्हा हे कक्ष उभारण्यात आले असून सर्व सुविधा या कक्षात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

– राजेंद्र जगताप, जिल्हा नियंत्रक, पालघर विभाग

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 00:02 IST
Next Story
कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येत जिल्हा राज्यात दुसरा, पालघर जिल्ह्यात एक हजार ३११ रुग्ण