scorecardresearch

ऐतिहासिक बुरुजालगत बांधकाम; केळवे दांडाखाडी टेहळणी बुरुजाच्या सुरक्षेसाठी  गडप्रेमींचे प्रयत्न

पालघर तालुक्यातील केळवे बाजार येथील केळवा दांडाखाडी टेहळणी बुरुजालगत सीमा शुल्क निवारण अधीक्षक कार्यालयतर्फे बांधकाम करण्यात आले आहे.

पालघर: पालघर तालुक्यातील केळवे बाजार येथील केळवा दांडाखाडी टेहळणी बुरुजालगत सीमा शुल्क निवारण अधीक्षक कार्यालयतर्फे बांधकाम करण्यात आले आहे. पुरातत्त्वीय नियमावलीचे भान न राहता केलेल्या या बांधकामामुळे ऐतिहासिक वास्तूला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबद्दल इतिहासप्रेमी नाराज असून शासनाकडे तक्रार केलेली आहे.

केळवे दांडाखाडीजवळच्या टेहळणी बुरुजालगत सीमा शुल्क निवारण अधीक्षक कार्यालयअंतर्गत लोखंडी तारांचे आणि विटांचे बांधकाम करण्यात आले आहे. पुरातत्त्वीय नियमावलीचे भान न राहता बेजबाबदारपणे करण्यात आलेल्या या बांधकामामुळे ऐतिहासिक स्मारकस्थळाचे मूळ स्वरूप बिघडले आहे. या बांधकामामुळे बुरुजाच्या चौफेर भटकंतीचा मार्ग बंद झाला आहे.

केळवे सागरी तथा सीमा शुल्क निवारण कार्यालयाच्या अधीक्षक कार्यालयाची उभारणी करताना कार्यालयाची िभत या दुर्गाच्या भिंतीला जोडण्यात आली आहे. दुर्गप्रेमी गेल्या १५-१६ वर्षांपासून केळवा भागातील गड-किल्ल्यांची साफसफाई करून तसेच विजय दिन साजरा करून इतिहासप्रेमी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये इतिहास जपण्याचा व ऐतिहासिक माहितीचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अशा प्रकारे सरकारी कार्यालयांकडूनच जर गड-किल्ल्यांना लागून असलेल्या ठिकाणी बांधकाम केले तर कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न इतिहासप्रेमींना पडला आहे. तरी या बांधकामाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी स्थानिक इतिहासप्रेमींनी केली आहे.  

पालघर जिल्ह्यातील  अनेक ऐतिहासिक स्थळे, केळवे परिसरातील ऐतिहासिक आरमारी पर्वाची साक्ष असणारे गडकोट आज कोणत्याही प्रकारे संरक्षित नाहीत.

केळवे प्रांताच्या ऐतिहासिक स्मारकस्थळांत केळवे भुईकोट, केळवे जंजिरा, केळवे कस्टम कोट १, केळवे कस्टम कोट २, पोर्तुगीज वखार, केळवे फुटका पाणबुरूज, दांडा कोट, कितल कोट, कितल कोट वखार, मराठी शाळा कोट, कितल कोट बुरूज यांचा समावेश होतो; परंतु उपलब्ध यादीतील

एकही किल्ला राज्य पुरातत्त्व व केंद्रीय पुरातत्त्वअंतर्गत संरक्षित नाही हे दुर्दैवी आहे.  

केळवे परिसरातील आरमारी पर्वाचे साक्ष देणारे गडकोट संवर्धनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. केळवे दांडा खाडी टेहळणी बुरुजाचे मूळ स्वरूप नीट राहावे यासाठी प्रशासकीय यंत्रणा व पुरातत्त्वीय दृष्टिकोन यांचे सहकार्य अपेक्षित आहे. – योगेश पालेकर,

संवर्धन मोहीम केळवेचे प्रमुख

गडकोटांचे मूळ स्वरूप, पुरातत्त्वीय वैभव जपले पाहिजे; परंतु केळवे पर्यटन आराखडय़ात आजही ऐतिहासिक गडकोटांचा गांभीर्याने विचार केला जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. – श्रीदत्त राऊत, किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Historic bastion construction efforts gadpremi security kelve dandakhadi watch tower amy

ताज्या बातम्या