सीमा शुल्क निवारक अधीक्षक कार्यालय कस्टम कार्यालय केळवे अंतर्गत केळवे प्रांताच्या ऐतिहासिक टेहळणी बुरुजास कुंपण घालण्यात आले होते. या बाबत इतिहास प्रेमी मंडळीने या कामी विरोध दर्शवून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा केल्यानंतर देखील उभा बुरुजाला आजही कुंपण कायम आहे. यामुळे पालघर जिल्ह्यतील ऐतिहासिक स्थळे, गडकोट, मूर्ती वैभव इत्यादी स्मारक स्थळे बेवारस व दुर्लक्षित म्हणून सातत्याने चर्चेचा विषय झाला आहे.

केळवे परिसरातील ऐतिहासिक आरमारी पर्वाची साक्ष असणारे गडकोट आजही कोणत्याही प्रकारे संरक्षित नसल्याने मानवी व नैसर्गिक अतिक्रमणे यांची झळ सोसत नामशेष होण्याच्या प्रवासाला लागले आहेत. दुर्गमित्रांच्या यादीत केळवे कस्टम कोट नावाने परिचित असलेला कोट स्थानिक पातळीवर केळवे-दांडा खाडी टेहळणी बुरुज या नावाने ओळखला जातो. गेल्या १० दिवसांपूर्वी केळवे कस्टम कोट १ या ऐतिहासिक स्मारक अवशेषाला ‘सीमा शुल्क निवारक अधीक्षक कार्यालय’ (कस्टम कार्यालय केळवे) अंतर्गत लोखंडी तारा व नवे विटांचे बांधकाम जोडण्यात आलेले आहे. कोणत्याही पुरातत्वीय नियमावलीचे भान न राखता अत्यंत बेजबाबदारपणे करण्यात आलेले हे काम ऐतिहासिक स्मारक स्थळाचे मूळ स्वरुप अत्यंत कुरूप करत आहे.

या नव्याने झालेल्या बांधकामामुळे या वास्तुच्या चौफेर भटकंतीचा मार्गही बंद करण्यात आलेला आहे. जानेवारी व मार्चमध्ये ‘लोकसत्ता’सह इतर काही वृत्तपत्रांत याबाबत सविस्तर वृत्त तपशील प्रकाशित झाले होते. तसेच २३ मार्च रोजी या चुकीच्या बांधकामाबाबत दुर्गमित्रांनी मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, सांस्कृतिक मंत्री, जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य पुरातत्व विभाग, पोलीस प्रशासन इत्यादींना शेकडो तक्रार ई-मेल पाठवले होते. याला सहा महिने पूर्ण होऊनही संबंधित विभागाने कोणतेही सहकार्य व उपाययोजना न केल्याचे स्पष्ट झालेले आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता यावर मूक आंदोलन अंतर्गत निषेध नोंदवणे काळाची गरज आहे, असे दुर्गमित्र संघटनांचे मत झाले आहे.

केळवे प्रांताच्या ऐतिहासिक स्मारक स्थळांत केळवे भुईकोट, केळवे जंजिरा, केळवे कस्टम कोट १, केळवे कस्टम कोट २, पोर्तुगीज वखार, केळवे फुटका पाणबुरुज, दांडा कोट, कितल कोट, कितल कोट वखार, मराठी शाळा कोट, कितल कोट बुरुज यांचा समावेश आहे. उपलब्ध यादीतील एकही किल्ला राज्य पुरातत्व व केंद्रीय पुरातत्व अंतर्गत संरक्षित नाही हे दुर्दैवी असल्याचे मत इतिहास प्रेमींनी नोंदविले आहे.

केळवे परिसरातील आरमारी पर्वाचे साक्ष देणारे गडकोट संवर्धनासाठी सर्वोतोपरी कष्ट घेत आहोत, केळवे दांडा खाडी टेहळणी बुरुजाचे मूळ स्वरूप नीट रहावे यासाठी संबंधित प्रशासनाने सहकार्य करणे आवश्यक आहे. –योगेश पालेकर, प्रमुख, संवर्धन मोहिम केळवे

गडकोटांचे मूळ स्वरूप, पुरातत्वीय वैभव जपण्यासाठी समस्त दुर्गमित्र कटिबद्ध आहोत. केळवे प्रांताच्या ऐतिहासिक टेहळणी बुरुजास बेबंद कुंपणाबाबत लवकरच जाहीर आंदोलन व मूक मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. -श्रीदत्त राऊत, प्रमुख, किल्ले वसई मोहिम