नीरज राऊत
पालघर: फलाटावर येणाऱ्या गाडय़ांची वर्दी देणारी रेल्वे स्थानकावरील ‘घंटा’ गेल्या काही वर्षांपासून वापरात नाही. अनेक वर्षे प्रवाशांना गाडय़ांच्या आगमनाची सूचना देणारी ही वस्तू ऐतिहासिक ठेव म्हणून जमा झाली आहे. पालघर रेल्वे स्थानकात ही घंटा पूर्वीच्या ठिकाणी बांधून ठेवण्यात आली असून प्रवाशांना जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.
रेल्वे फलाटावर स्टेशन मास्टर केबिनच्या बाहेर असणाऱ्या या घंटेद्वारा येणाऱ्या गाडीची सूचना देण्यात येत असे. तीन टोले वाजले म्हणजे गाडी पूर्वीच्या दोन स्थानकामधून निघाली, तर पाच टोले वाजले म्हणजे लगतच्या स्टेशनवरून गाडी पास झाली असे संकेत दिले जायचे. हे टोले सलग किंवा थांबून देण्याच्या पद्धतीवरून येणाऱ्या गाडीची दिशा ओळखली जायची. एखादी अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास विशिष्ट पद्धतीने टोले वाजवण्याची पद्धतदेखील कार्यान्वित होती.
१६ एप्रिल २०१३ रोजी डहाणू रोडपर्यंत उपनगरीय सेवा सुरू करण्यात आली आणि त्यानंतर या घंटेच्या टोल्यांऐवजी प्रथम रेल्वे मास्तर व नंतर स्वयंचलित उद्घोषणा पद्धत कार्यान्वित झाली. कालांतराने प्रत्येक फलाटावर ‘इंडिकेटर’ कार्यरत झाले असून फलाटावर गाडी येण्यासाठी असणाऱ्या कालावधीचा उल्लेख काही ठिकाणी करण्यात होत असतो. या सर्व बदलांमुळे रेल्वे स्थानकावरील घंटा व ती वाजवण्याची पद्धत संपुष्टात आली.
आता केवळ शोभेची वस्तू
पितळेच्या दीड- दोन इंच जाड व सुमारे एक फूट व्यासाच्या जुन्या घंटा काही रेल्वे स्थानकांमध्ये पूर्वी काढून टाकण्यात आले असून पालघरसह इतर काही स्थानकांमध्ये त्या अजूनही अस्तित्वात आहेत. मात्र या रेल्वेमधील घंटांची फक्त ऐतिहासिक महत्त्व शिल्लक असून वर्क इन प्रोग्रेसह्ण किंवा अंडर मेंटेनन्सह्ण असे फलक लावून त्या जणू शोभेच्या वस्तूप्रमाणे ठेवण्यात आल्या आहेत.
