पालघर: जिल्ह्यातील विविध समित्यांच्या दौरा यांच्या अनुषंगाने शालेय शिक्षक भरडला जात असतानाच आता शालेय सुट्टी सुरू झाल्यानंतर स्वच्छ विद्यालय सर्वेक्षणाचे मूल्यांकन दौरे आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे सुट्टीवर गेलेल्या शिक्षकांच्या संकटात वाढ झाली आहे. शिवाय या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहावे लागणार असल्याने सुट्टीच्या काळात जिल्ह्यातील शाळा भरणार आहेत.
‘स्वच्छ भारत- स्वच्छ विद्यालय’ अभियानाअंतर्गत भारत सरकारने सन २०२२-२३ या वर्षांसाठी स्वच्छ विद्यालय स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. पालघर तालुक्यातून ५६६ शाळांनी या अभियानात नोंदणी केली होती. त्यापैकी तीन ते पाच तारांकन (स्टार) प्राप्त झालेल्या ५५९ शाळा या स्वच्छ विद्यालय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. या शाळांची तपासणी १५ मेपर्यंतच्या कालावधीत करण्याचे केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात वेगवेगळय़ा शाळांच्या शिक्षकांचा सहभाग असणारे मूल्यांकन पथक या शाळांना भेटी देणार आहेत.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेने शाळांना २ मेपासून सुट्टी जाहीर केली असताना समग्र शिक्षा गट साधन केंद्र, पालघरतर्फे २ मे रोजी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना पत्र काढून स्वच्छ विद्यालय सर्वेक्षणासाठी नमूद केलेल्या अधिकारी, कर्मचारी व निवडक शिक्षक तसेच अभियानात पात्र ठरलेल्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत पत्रक काढले आहे,
विशेष म्हणजे मूल्यांकन दौऱ्याच्या दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक व शाळेतील विद्यार्थी शाळाभेटीच्या वेळी उपस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकावर निर्देशित करण्यात आली आहे. तसेच एखाद्या शाळेचे मूल्यांकन अपूर्ण राहिले तर त्याची जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख शिक्षकावर निश्चित करण्यात आली असल्याने या समितीच्या दौऱ्यांमुळे मुख्याध्यापक व शिक्षकांवर टांगती तलवार राहणार आहे.
अनेक शिक्षकांनी रेल्वे, बस तिकीट आरक्षित केल्यामुळे आपल्या मूळ गावी गेले आहेत, तर काही जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हे सर्वेक्षण सुट्टीवर बाहेरगावी गेलेल्या शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी त्यांनी शिक्षकांवर पुढे ढकलली असून मुलांना शाळेत हजर ठेवण्याची जबाबदारी वर्गशिक्षकांची राहील असे फर्मान काढले आहे. एकंदरीत उन्हाळी सुट्टीत शिक्षकाना अनेक दिवस शाळेत राहावे लागणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.
पंचायत राज समिती दौऱ्याची तयारी
पंचायत राज समितीचा दौरा १९ ते २१ मे दरम्यान होणार असून शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार कोणत्याही केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व शिक्षक यांनी २१ मे पर्यंत पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शाळा सुरू ठेवल्या जातील, तसेच शाळेत स्वच्छता आणि शालेय दप्तर अद्ययावत करून ठेवले जाईल याची दक्षता घ्यावयाची आहे. त्याचबरोबर सुवर्णमहोत्सवी वाटप, गणवेश वाटप, पाठय़पुस्तक वाटप व इतर योजना यांचे दप्तर वाटप करून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे तसेच या वेळेत सर्व शिक्षक पूर्णवेळ उपस्थित राहावे, अशा सूचना शिक्षण विभागाने काढले आहेत.
स्वच्छतेची जबाबदारी शिक्षकांवर
ज्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवला जातो अशा ठिकाणी अंगणवाडी मदतनीस यांच्याकडून शाळेची व स्वच्छतागृहाची सफाई केली जाते. तर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तयार खिचडी पुरवण्याची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी शालेय विद्यार्थी, शिक्षक हे शाळेची सफाई करीत असल्याचे दिसत आहे. सध्या विद्यार्थ्यांचा सुट्टीचा कालावधी सुरू असून स्वच्छता मूल्यांकन समितीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शाळा आणि स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची जबाबदारी शिक्षकांवर येऊन ठेपली आहे.
विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची डोकेदुखी
मे २०२१ या कालावधीत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारापोटी आलेल्या २१० रुपयांची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावयाची आहे. वेगवेगळय़ा बँकेत खाती असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्या अनुषंगाने प्रत्येक बँकेत रक्कम जमा करण्याचे शिक्षकांसमोर आव्हान उभे राहिले आहे. शिवाय जिल्हा परिषद शाळा यांचे बँक खाते जिल्हा मध्यवर्ती बँकेत असल्याने इतर खासगी बँकांकडून या उपक्रमात अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे दिसून आल्याने अडचणी निर्माण झाली आहे.
करोनानंतरदेखील गावातील आप्तेष्टांची भेट नाही!
गेल्या दोन वर्षांपासून करोना संक्रमणादरम्यान अनेक निर्बंधांमुळे तसेच शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या वेगवेगळय़ा सर्वेक्षणाच्या जबाबदारीमुळे शिक्षक मंडळी सुट्टीत आपल्या मूळ गावी जाऊ शकली नव्हती. यंदाच्या काळी महाराष्ट्रात करोना नियंत्रणात असल्याने अनेकांनी गावी जाऊन आपल्या आप्तेष्टांना भेटणे, आपल्या गावातील घरांची देखभाल दुरुस्ती करण्याचा विचार केला होता, मात्र दौरे व सर्वेक्षणाचे मूल्यांकन शाळा दौऱ्यामुळे यंदा हे शक्य होणार नाही, अशी चिन्हे दिसून येत आहेत.