सभेत विकासात्मक चर्चेकडे दुर्लक्ष

जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकारी, ठेकेदार यांचा भ्रष्टाचार, वैयक्तिक प्रकरणे अशा खोचक विषयांवर चर्चा झाली.

भ्रष्टाचार, वैयक्तिक प्रकरणेच गाजली

पालघर: जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकारी, ठेकेदार यांचा भ्रष्टाचार, वैयक्तिक प्रकरणे अशा खोचक विषयांवर चर्चा झाली. अधिकारीवर्गही सभेच्या सदस्यांचे  विषय सोडवण्यात व आश्वासन देण्यात मग्न होते. त्यामुळे ग्रामीण विकासाचा मुद्दा दूर राहिला याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. सभा रात्री ८ वाजेपर्यंत सुरूच होती. इतिवृत्तावर सुमारे चार तास चर्चा झाली. सभेमध्ये विरोधी पक्षाऐवजी सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीच जादा सहभाग घेतला. यावेळी शिक्षण अधिकारी लता सानप यांच्या बदलीचा ठराव व चौकशीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवल्याचे उत्तर प्रशासनाने सभागृहाला दिले. जनजीवन मिशन अभियानाचा मुद्दा, कामे अपूर्ण असतानाही देयक अदा,  पाणीपुरवठा योजनांचे काम अपूर्ण आदी मुद्दे प्रकर्षांने समोर आले. या वेळी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही आश्वासन दिले गेले.

सभागृहातील सत्ताधारी पक्षातील एक उच्चपदस्थ सदस्याने एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडून उसनवारीने दोन लाख पन्नास हजार पैसे मागितल्याची बाब पुढे आली. या प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल आरोग्य विभागाने सर्वाना पाठवला असला तरी या प्रकरणातच आरोग्य विभागाने एवढी तत्परता कशी दाखवली, असा सवाल केला गेला. पदोन्नतीमधील घोळ, गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, गैरवर्तणूक आदी विषयांवर सदस्यांनी संताप व्यक्त केला.  या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षापेक्षा जास्त प्रश्न सत्ताधारी पक्षाचे दिसून आले. याचबरोबरीने विकासात्मक चर्चा बाजूला सारून इतर विषयांवर चर्चा केल्यामुळे या सभेतून हवे तसे निष्पन्न झालेले नाही, अशी नाराजी विरोधी पक्षातील काही सदस्यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेमध्ये अनेक गैरव्यवहार सुरू आहे. सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग हा तर चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे त्यासह इतर विभागप्रमुखांना व जिल्हा परिषदेवर मालकी गाजवणाऱ्या ठेकेदारांना शिक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून असे विषय चर्चेला आलेच पाहिजेत.

– संदेश ढोणे, सदस्य, जि.प. पालघर

विकासात्मक चर्चा बाजूला सारून इतर विषयांवर चर्चा केल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी या सर्वसाधारण सभेमध्ये काहीच निष्पन्न झालेले नाही व होत नाही. 

– सुरेखा थेतले, विरोधी पक्षनेत्या, जि.प. पालघर

जिल्हा परिषदेच्या सभागृहातून जिल्ह्याच्या विकासासाठीच चर्चा घडून येते. जिल्हा विकासासाठी हे सभागृह व प्रशासन कटिबद्ध आहे व राहील असा ठाम विश्वास मला आहे.

-वैदेही वाढाण, अध्यक्ष, जि.प. पालघर

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ignoring developmental discussions meeting ysh

Next Story
अंगणवाडय़ांत निकृष्ट आहार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी