इंधन, धान्य वितरणातील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष

पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, धान्य, खाद्यतेल आदी वितरणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहेत.

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पुरवठा विभाग हतबल

पालघर : पालघर जिल्ह्यात इंधन, धान्य वितरणातील गैरप्रकार सातत्याने वाढत आहेत. त्याकडे जिल्हा पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आरोप हे जरी खरी असले तरी या गैरप्रकारांविरोधातील कारवाईसाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याची हतबलता पालघर जिल्हा पुरवठा विभागाकडून व्यक्त केली जात आहे. विभागात ५० टक्के जागा रिक्त असल्याने त्याचा अतिरिक्त कामाचा ताण सेवेतील कर्मचाऱ्यांवर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.

पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, धान्य, खाद्यतेल आदी वितरणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. त्याद्वारे नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग कार्यरत असतो, परंतु विभागात ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या तुटवडा भासत असल्यामुळे या प्रकारांना आळा घालता येत नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

पालघर जिल्हा पुरवठा विभागात ३५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी अठरा पदे भरली आहेत. १७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे या ३५ पदांपैकी २९ पदे स्थायी असून उर्वरित सहा अस्थायी पदांपैकी तीन महत्त्वाची पदे रिक्त आहेत.

रिक्त असलेल्या पदांमध्ये साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, धान्य खरेदी अधिकारी व लेखा अधिकारी तसेच जिल्हा लेखा पर्यवेक्षक, लघु टंकलेखक व महसूल साहाय्यक ही पदे गेली अडीच वर्षांपासून रिक्त आहेत.  अलीकडच्या काळात झालेल्या भरती प्रक्रियेनंतर पुरवठा विभागात काम करणाऱ्या सहा महसूल साहाय्यक पदावरील कर्मचाऱ्यांना बढती मिळाल्यानंतर त्या पदावर अजूनही नवीन नेमणुका झाल्या नसल्याने जिल्हा पुरवठा विभागाचे कामकाजावर परिणाम  झाला आहे.        सन २०१९ मध्ये असलेल्या निवडणुकांपाठोपाठ करोना संक्रमण झाल्याने दुर्बल घटकांना केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निर्देशानुसार धान्य वितरणात पूर्ण व्यवस्था व्यस्त राहिली होती. मर्यादित मनुष्यबळात वेळेत काम पूर्ण करण्याचे व वितरण करण्याचे आव्हान होते, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय अहिरे यांनी सांगितले.  मर्यादित मनुष्यबळामुळे गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सी, पेट्रोल पंप तसेच सॉल्व्हन्ट बाळगणाऱ्या आस्थापनांकडे पुरवठा विभागाला पुरेशा पद्धतीने लक्ष देता येत नसल्याची हतबलता त्यांनी बोलून दाखविली.   तारापूर कथित गॅस चोरी प्रकरणाची  सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी

तारापूर येथील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या भाग्यश्री गॅस वितरण एजन्सीकडून दिल्या जाणाऱ्या सिलिंडरमधून काही राजस्थानी कामगारांनी गॅस चोरी करण्याच्या कथित प्रकाराबाबत पुरवठा विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. या प्रकरणाची सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या समक्ष ठेवण्यात आली आहे. या एजन्सीमार्फत पुरवठा करणारे गॅस सिलिंडर घिवली येथे आढळले होते व त्यासोबत रिकामी सील सापडले होते. हे सिलिंडर बाळगणारे कामगार एजन्सीतर्फे काम करत होते का? त्यांच्या पलायनानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे का, न वापरलेले सील कंपनी बाहेर कसे आले, एचपी गॅसच्या सील व्यवस्था सदोष आहे का इत्यादी बाबींवर चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात गॅस वितरण एजन्सीची बाजू नोंदवून घेऊन तसेच एचपी गॅस व्यवस्थापनाची बाजू समजून घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय अहिरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ignoring irregularities in fuel grain distribution akp

Next Story
जिल्ह्यत ३८ बालमजूरांचा शोध
ताज्या बातम्या