scorecardresearch

खासगी रुग्णालय उभारणीसाठी कायदेशीर नियमांना बगल

सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटींमुळे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात विजय वल्लभ रुग्णालयात १५ निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे खासगी रुग्णालय उभारणीसाठीच्या कायदेशीर नियमांना बगल देऊन जिल्ह्यात  रुग्णालये उभारली जात आहेत.

इमारतीचे काम सुरू असताना तळमजल्यावर उभारलेले रुग्णालय रुग्णांसाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पालघर: सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटींमुळे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात विजय वल्लभ रुग्णालयात १५ निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे खासगी रुग्णालय उभारणीसाठीच्या कायदेशीर नियमांना बगल देऊन जिल्ह्यात  रुग्णालये उभारली जात आहेत.  त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालघर शहरासह अनेक ठिकाणी नियमानुसार कागदपत्रे नसतानाही अनेक रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत रुग्णालय सुरू करण्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.  शहरातील चार रस्ता छत्रपती शिवाजी चौक परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये असेच रुग्णालय सुरू आहे. करोना रुग्णालयाच्या नावाखाली येथे इतर रुग्णसेवा पुरवल्या जात आहेत. या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसताना हे रुग्णालय व त्याच्या बाजूला निदान केंद्र सुरू असल्याची  माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे रुग्णालय उभारताना आवश्यक असलेल्या परवानग्या न तपासता  रुग्णालय सुरू करण्याचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत रुग्णालयाला देण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील अनेक भागांमधील काही रुग्णालयांचे संरचनात्मक लेखा परीक्षण, अग्निसुरक्षा  तसेच  विद्युत परीक्षण करण्यात आलेले नाही असे असतानाही प्रमाणपत्र दिले जात आहे. अनेक जुन्या व मुदतबाह्य इमारतींमध्ये  खासगी रुग्णालये,  दवाखाने सुरू आहेत. अनेक इमारतींत औद्योगिक प्रयोजनार्थ आरक्षित ठेवलेल्या गाळय़ांमध्ये रुग्णालये उभी आहेत. या गाळय़ांमध्ये रुग्णालय उभारताना इमारतीच्या मूळ संरचनेत अनेक बदल केले जात आहेत यामुळे इमारतीला धोका  निर्माण होत आहे. या बाबी न तपासता थेट प्रमाणपत्र दिले जात आहे. पालघरमधील रुग्णालयाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रुग्णालय सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्याचे तेथील व्यवस्थापनाने म्हटले असले तरी गेल्या दोन वर्षांत या इमारतीला अशा कोणत्याही प्रकारचे भोगवटा प्रमाणपत्र दिले नसल्याचे नगर परिषदेच्या नगर रचना विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

अर्धवट बांधकाम केलेल्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू असताना एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरितच आहे त्यामुळे कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करून त्यानंतरच रुग्णालयांना प्रमाणपत्र देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.  दरम्यान, पालघर शहरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्यात उभारण्यात आलेले रुग्णालय याआधी करोना उपचार केंद्र म्हणून प्रशासनाच्या परवानगीने उभारण्यात आले होते. मात्र उपचार केंद्राच्या नावाखाली आजही हे रुग्णालय भोगवटा प्रमाणपत्र नसताना इतर आरोग्यविषयक सेवा देत आहे.

कोणत्याही परवानग्या न तपासता प्रमाणपत्र देणे आता नवीन राहिले नाही. आरोग्य व्यवस्थेबाबत तर न बोललेलेच बरे. एखादी घटना घडल्यानंतर तेथील व्यवस्थापन हात झटकतील. मात्र रुग्णांच्या जिवाचे काय ? असा प्रश्न उपस्थित होतो.

– सतीश दहिवले, पालघर नागरी कृती समिती

माझी या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी संबंधित रुग्णालयास प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र तरीही आवश्यक ती माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू.

-विजय काळबांडे, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ignoring legal rules setting private hospital ysh