पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाल्यानंतर या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न अद्यापही कायम आहे. या दुर्घटनेला १५ दिवस उलटल्यानंतरदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालघर जिल्ह्यातील महामार्गाच्या भागात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास प्राधान्य दिलेले नाही. तर  रुग्णवाहिका, क्रेनसारख्या अत्यावश्यक सुविधेसाठी समर्पित यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसून आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

चारोटी टोल नाक्यापासून काही अंतरावर असणाऱ्या सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांच्या गाडीला ४ सप्टेंबर रोजी अपघात झाला होता. या ठिकाणच्या पूर्वी काही अंतरावर ‘सावधान’ आणि ‘वाहन हळू चालवा’ असा इशारा फलक लावण्यात आला असला तरी इतर अपघात प्रवण क्षेत्र अजूनही दुर्लक्षित राहिली आहेत. काही ठिकाणी पुलाच्या कठडय़ापूर्वी रिफेलक्टर लावण्यात आले असले तरी त्याच्यावर गोणी टाकून झाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे धक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा प्रकारांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गस्त पथकाचे दुर्लक्ष झाले असून एकंदरीत या पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.

विशेष म्हणजे या महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करण्यासाठी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने दौरा केला असता त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची चिन्हांकन केलेली रुग्णवाहिका नसल्याचे यावेळी दिसून आले होते. तसेच पालघर व डहाणू तालुक्यातील काही खासगी रुग्णवाहिकांना अपघाताच्या प्रसंगी पाचरण केले जात असल्याची माहिती पुढे आली होती. महामार्गावरील अपघातांच्या वेळी वापरात येणारी एक क्रेन बंद अवस्थेमध्ये तर दुसरी अन्य कामांसाठी इतरत्र कार्यरत असल्याचे आढळून आले होते. राष्ट्रीय महामार्गावरील गतिविधीवर देखरेख ठेवण्यासाठी असणारे गस्त घालणारे वाहन (पेट्रोलिंग व्हॅन) सुस्थितीत नसल्याचे आरोप केले जात आहेत. एकंदरीतच टोल वसुली करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी हाताळण्यासाठी समर्पित नियंत्रण नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत खासदारांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे चिन्हांकन केलेली समर्पित यंत्रणेबाबत विचारणा केली असता त्याबद्दल उत्तर देण्याचे टाळले असून त्याऐवजी पर्यायी यंत्रणा असल्याचे त्यांना सांगितले आहे.

अपघात प्रवण क्षेत्रांचा अभ्यास

महामार्ग पोलीस तसेच जिल्हा पोलिसांतर्फे महामार्गावर असणाऱ्या अपघात प्रवण क्षेत्रांचा व त्या ठिकाणी करावयाच्या अल्प मुदतीच्या उपाययोजनांचा अभ्यास केला जात आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कालबद्ध पद्धतीने उपाययोजना आणण्यासाठी पत्र देण्यात येणार आहे. उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्यास महामार्ग प्राधिकरण किंवा संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याचे पोलीस विचाराधीन असल्याचे  सूत्रांकडून सांगण्यात आले.