अवैध वाहतुकीमुळे सायवन-धुंदलवाडी रस्त्याची दुर्दशा

विजय राऊत
कासा: सीमेवरील तपासणी तसेच क्षेत्रीय परिवहन नाका चुकवण्यासाठी गुजरातकडून येणाऱ्या मालवाहतूकदारांकडून महाराष्ट्रात अवैध मार्गाने प्रवेश होत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे अवलंबिलेल्या अवैध मार्गाची दुर्दशा झाली आहे. तलासरी-उधवा, धुंदलवाडी तसेच तलासरी- उधवा- सायवन चारोटी या मार्गे तपासणी नाके चुकवत हे मालवाहतूक महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत असून त्यामुळे हे मार्ग म्हणजे अवैध वाहतुकीचे मार्ग बनले आहेत.
दापचरी येथील सीमा तपासणी नाक्यावर गुजरातमधून आलेल्या वाहनांमध्ये असलेल्या मालाचे वजन केले जाते. तसेच वाहनचालकांकडे मालाचे अधिकृत बिले तपासली जातात. जर चुकीच्या पद्धतीने मालवाहतूक होत असेल तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाते. अशीच तपासणी दापचरी येथील क्षेत्रीय परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ चेक पोस्ट) तपासणी नाक्याद्वारेही होते. क्षमतेपेक्षा जादा भरलेल्या मालवाहतुकीमुळे वाहनांना मोठय़ा प्रमाणात अपघात होतात तसेच रस्त्याचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे अशा वाहनांवर मोठय़ा प्रमाणात दंड आकारला जातो. वाहने अतिभारवाहू असतील तर किमान २० हजार रुपये दंड आकारला जातो. तर एक टनासाठी एक हजार रुपये, दोन टनासाठी तीन हजार रुपये, तीन टन असेल तर सहा हजार रुपये आणि पुढील प्रत्येक टनासाठी चार हजार रुपये प्रतिटन अतिरिक्त दंड आकारला जातो. त्यामुळे अतिभारवाहू वाहनांचा दंड वाचवण्यासाठी सीमा तपासणी नाका आणि क्षेत्रीय परिवहन तपासणी नाका वाहनचालकांकडून टाळला जातो. तो टाळण्यासाठी चालक आपली वाहने तलासरी-उधवा -धुंदलवाडी आणि तलासरी – उधवा-सायवन – चारोटी या मार्गे नेतात. त्यामुळे सीमा तपासणी नाका, आणि क्षेत्रीय परिवहन तपासणी नाका यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते.

BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

रात्रीच्या वेळी ही वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू असते. एकीकडे दंड न भरल्यामुळे शासनाचे नुकसान तर होतेच तर दुसरीकडे ही वाहने तलासरी उधवा धुंदलवाडी, तलासरी- उधवा-सायवन-चारोटी या रस्त्याने जात असल्याने या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खूप मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना या रस्त्याने आपली वाहने चालवणे त्रासदायक झाले आहे.
मोठंमोठे ट्रेलरसारखी वाहने या रस्त्याने जात असल्याने अपघातांचे प्रमाणसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. ही चोरटय़ा पद्धतीने होणारी वाहतूक तात्काळ थांबवली जावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात असून याबाबत राज्य मार्ग पोलीस तसेच स्थानिक पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण घेणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

माहिती ऑनलाइन उपलब्ध
देशभरात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्यामुळे केंद्र सरकार आगामी काळात राज्यांच्या सीमेवर असलेले क्षेत्रीय परिवहन तपासणी नाके बंद करणार आहे. वस्तू आणि सेवा कराची आकारणी होत असल्यामुळे राज्यांच्या तपासणी नाक्यांची आवश्यकता नसल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. वाहन आणि वाहनचालकांची माहिती परिवहन आणि सारथी या ऑनलाइन प्रणालीवर उपलब्ध आहे.

दापचरी येथील सीमा तपासणी नाका आणि क्षेत्रीय परिवहन नाका (आरटीओ) चुकवण्यासाठी अतिभार मालवाहतूक करणारी वाहने तलासरी उधवा सायवन चारोटी, तलासरी उधवा धुंदलवाडी मार्गे जातात. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच मोठय़ा प्रमाणात अपघातही होत आहेत. तरी या भागातून होणाऱ्या अवैध वाहतूक रोखण्यासाठी आरटीओ आणि पोलीस खात्याला पत्र दिली आहेत. – काशिनाथ चौधरी, सदस्य, जिल्हा परिषद.