डहाणू : समूद्र किनाऱ्यावर बिनबोभाट अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. रेतीची अवैध तस्करी आणि उत्खननामुळे समूद्र किनारे खचण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. यात लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. महसूल विभागाने याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

डहाणू समूद्र किनारा पोखरण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. धाकटी डहाणू , चिंचणी, दिवा दांडा, डहाणू मांगेलवाडा, डहाणू दूबळपाडा, सतीपाडा, नरपड, आगर, चिखला, झाई समूद्र किनाऱ्यावर रेतीचोर तळ ठोकून आहेत. सतीपाडा अणि चिखला येथे तर मोठमोठाले खड्डे तयार झालेले आहेत. वाळू चोरीसाठी तर समुद्रात थेट बैलगाडय़ा आणून वाळूची वाहतूक केली जाते. जवळपास तीन ते चार फूट खोल आणि १० ते १७ फूट लांब खड्डे खणून उत्खनन केले जाते. साधारण या कामात दिवसा लहान मुले, महिलांना गोववून होणाऱ्या कारवाईपासून दूर राहण्याचा रेतीचोरांचा हेतू असल्याचे सांगितले जाते. कवडीमोल मोबदल्यात स्थानिक मजुरांकडून वाळू बाहेर आणून देण्याचे काम केले जात असल्याचे पाहायला मिळते .त्यानंतर मध्यरात्र ते पहाटे सकाळी ही वाळू वाहून नेली जाते, असे परिसरातील ग्रामस्थांकडून सांगितले जाते.

वाळू चोरी पकडण्यासाठी पथके तयार केले आहेत. अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.

-अभिजित देशमुख, तहसीलदार