कासा : तलासरी तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या परिसरात अनेक भंगार व्यावसायिक रात्रीच्या वेळेस ते प्लास्टिक आणि केबल्स जाळताना दिसतात. महामार्गावरून ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारे टँकर आणि वाहनांच्या रहदारीच्या पार्श्वभूमीवर असे करणे धोकादायक असून, प्रशासनाने त्याची दखल घेण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या पश्चिमेला तास्कन हॉटेलच्या शेजारील परिसरात बारा ते पंधरा भंगारची दुकाने आहेत. त्यातून तांबे, अॅलल्युमिनिअम आणि अन्य धातू वेगळे करण्यासाठी प्लास्टिक, रबर व ज्वलनशील वस्तू सर्रास जाळल्या जातात. अंधार होऊ लागताच या वस्तू जाळायला सुरुवात होते. या पदार्थानी वातावरणात उष्मा पसरतोच, परंतु त्याची दुर्गंधी आणि विचित्र वासही पसरतो. त्याचबरोबर गडद रंगाचा धूर वातावरण प्रदूषित करतो. त्यामुळे आसपास उभ्या वाहनांना अथवा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना आगीचा धोका संभवतो. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारे टँकर धावत असतात. भंगाराला लावलेल्या आगींमुळे याआधीही अपघात झाल्याचे तसेच वाहतुकीत अडथळे आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या आगीच्या धुरामुळे प्रदूषण तर होतेच, परंतु हा घाणेरडा धूर नागरिकांच्या तसेच परिसरातील फळ झाडांच्या आरोग्यासाठीही अतिशय मारक आहे. त्यामुळे हे प्रकार बंद व्हावेत. शिवाय जमा झालेल्या भंगाराची नीट चौकशी व्हावी, तो कोणत्या प्रकारचा कचरा आहे, किती प्रदूषणकारक आहे, त्याची विल्हेवाट कशाप्रकारे लावणे अपेक्षिंत आहे, या सगळय़ाची चौकशी व्हावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.