स्थलांतरित कुटुंबांची आता नियमित आरोग्य तपासणी

रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या बांधकाम व वीटभट्टी कामगार, मजुरांच्या आरोग्याकडे प्रशासनाने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

पालघर : रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या बांधकाम व वीटभट्टी कामगार, मजुरांच्या आरोग्याकडे प्रशासनाने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पालघर जिल्ह्यतील ग्रामीण व दुर्गम भागातून रोजगारासाठी विविध ठिकाणी स्थलांतर झालेल्या माता, बालके व त्यांच्या कुटुंबीयांची आता आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यांना पोषण व इतर सुविधाही देण्यात येणार आहेत.

पालघर जिल्ह्यत विविध ठिकाणी स्थलांतर झालेल्या नागरिकांचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात आले आहे.  या स्थलांतरित कुटुंबांना अंगणवाडीशी जोडून घेऊन त्यामार्फत त्यांना आरोग्य सुविधा पुरवल्या जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दर महिन्यातून एकदा गुरुवारी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी या कुटुंबांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.   यामध्ये  विविध आजारांवर औषधोपचार व पुढील उपचार आरोग्य विभागामार्फत केले जाणार आहेत. स्थलांतर झालेल्या मजूर कुटुंबीयांच्या राहणीमान व आरोग्याच्या दृष्टीने वीटभट्टी मालकांसह इतर मालकांनी पुरेपूर काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याचबरोबरीने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या नजीकच्या रास्त भाव दुकानातून धान्यपुरवठा करण्यात यावा, लाभार्थ्यांना अतिरिक्त आहाराचा पुरवठा करणे, बालकांची देखभाल करण्यासाठी  वीटभट्टी मालकांनी सामाजिक दायित्व म्हणून व काम करण्यासाठी एका व्यक्तीची स्वतंत्र नियुक्ती करावी. वीटभट्टीच्या ठिकाणी  पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशा प्रकारच्या सूचना तहसीलदारांनी वीटभट्टी मालकांना द्याव्यात, असे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे.

जिल्ह्यतील नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी शासनाच्या विविध सेवा व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.  शिबिराच्या माध्यमातून आरोग्य अबाधित राखण्याचा प्रयत्न सुरू  आहे. 

सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पालघर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Immigrant families regular health checks ysh

Next Story
पालघर शहरात उद्योगांमुळे जलप्रदूषण