scorecardresearch

‘बीएसएनएल’ची सेवा सुधारणार; सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी तातडीने उपाययोजना

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना जलद इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी बीएसएनएलतर्फे ठोस उपाययोजना आखण्यात येणार आहे.

(पालघर जिल्ह्य़ातील इंटरनेट सेवा विस्कळीत होण्यामागची कारणे दर्शविणारे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.)

पालघर : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना जलद इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी बीएसएनएलतर्फे ठोस उपाययोजना आखण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्ह्यात बीएसएनएलची ग्राहक संख्या वाढवण्याच्या दृष्टीने तसेच जिल्ह्यातील क्षेत्रात बीएसएनएलच्या लॅण्डलाइन आणि मोबाइल सेवांमध्ये सुधार होण्याच्या दृष्टीने बीएसएनएल तातडीने आखणी करेल असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे.
बीएसएनएलच्या विविध सुविधांबाबत तसेच सेवांबाबत ग्राहकांच्या तक्रारीचा आढावा घेण्यासाठी खासदार राजेंद्र गावीत यांनी सोमवारी पालघर येथे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी बीएसएनएलच्या कल्याण विभागाचे महाव्यवस्थापक हरिओम सोळंकी आणि जिल्ह्यातील क्षेत्रीय प्रमुख उपस्थित होते. ग्रामपंचायतीला इंटरनेट सुविधेबरोबर या जोडण्यांसाठी कार्यरत बीबीएनएल तसेच बीएसएनएल यांचे विलीनीकरण झाले असल्याने हा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने एकत्रितपणे प्रयत्न करण्यात येतील असे या बैठकीत सांगण्यात आले. करोनाकाळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे अथवा नेटवर्क कमी असल्यामुळे ऑनलाइन अध्यापनाला मुकावे लागले होते. याखेरीज अनेक भागांत बीएसएनएल मोबाइलला नेटवर्क नाही, ब्रॉडबॅण्ड आणि एफटीटीएच सेवांमार्फत मिळणाऱ्या नेटवर्कला वेग नसल्याच्या तक्रारी पालघर जिल्ह्यातील सर्व भागांतून येत असल्यामुळे खासदार राजेंद्र गावीत यांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या बैठकित नमूद केले.
जिल्ह्यातील सर्व बँका आणि टपाल कार्यालयामधील ब्रॉडबॅण्ड सेवा परिवर्तित करणे, एफटीटीएच सेवा परिवर्तित करणे, पालघरच्या जिल्हा मुख्यालय संकुलात मोबाइल मनोरे उभारून त्या कार्यालयांमध्ये दर्जेदार नेटवर्क उपलब्ध करून देण्याचे काम प्राधान्याने करून देण्याचे आश्वासन हरिओम सोळंकी यांनी खासदार गावीत यांना दिले. पालघर जिल्ह्याच्या अति दुर्गम भागात अति जलद वायफाय सेवा देण्यासाठी पीडीओ (पब्लिक डेटा ऑफिस) सेवेची देशभरात नव्याने सुरू झालेल्या सुविधा सुरू करण्याचा मनोदय बीएसएनएल अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अल्पदरात कुठल्याही व्यक्तीला ही वायफाय सेवा उपलब्ध होणार असून जिल्हाधिकारी संकुल, नोंदणी कार्यालय, अति दुर्गम भागात सार्वजनिक ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा अधिक चांगल्या पद्धतीने द्यावी अशी अपेक्षा खासदार राजेंद्र गावीत यांनी व्यक्त केली.
‘भारतनेट’ अनेक ठिकाणी बंद असल्याची कबुली
पालघर जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींना भारतनेटची सेवा उपलब्ध करून दिली असली तरी काही तांत्रिक कारणांमुळे यापैकी बहुतांश जोडण्या बंद असल्याची कबुली बीएसएनएल अधिकाऱ्यांनी दिली. १ एप्रिल २०२२ पासून भारतनेट सुविधा देणारी बीबीएनएल ही कंपनी बीएसएनएलमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे यानंतर ग्रामपंचायतींना सुविधा देण्याची जबाबदारी बीएसएनएलची असणार आहे. भारतनेट सुविधा पुरवण्याकामी काही साहित्य बदलणे इत्यादी तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन लवकरात लवकर ही सुविधा पूर्ववत करण्याचे आश्वासन बीएसएनएल अधिकाऱ्यांनी दिले.
‘३ जी’, ‘४ जी’ची प्रक्रिया सुरू
पालघर जिल्ह्यात बीएसएनएलचे सुमारे १० हजार ग्राहक आहेत. त्यांचे २६० मनोरे असून त्यापैकी २ जी तंत्रज्ञान असलेल्या मनोऱ्यांना ३जी आणि ३जी मनोऱ्यांना ४ जी परिवर्तित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले. लॅण्डलाइनऐवजी थेट ओएफसी फायबरमार्फत असलेल्या एफटीटीएच सेवेत ग्राहकांना लॅण्डलाइन आणि जलद वेगाच्या इंटरनेट सेवेची सुविधा देण्यास ग्राहकांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Improving services bsnl immediate measures improve services gram panchayats district amy