डहाणू : डहाणू तालुक्यातील ऐना प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासनाच्या मालकीचे जुने साहित्य बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न मार्क्सवादी/ लेनिनवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. शुक्रवार ६ जून रोजी आरोग्य केंद्रातील जुनी कपाटे आणि साहित्य आवश्यक कोणतीही कार्यवाही न करता विक्री करण्याचा प्रयत्न इथल्या शासकीय अधिकाऱ्यांनी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ऐना येथील आरोग्य केंद्रातील जुने साहित्य विक्रीसाठी काढल्याचे समजताच गावातील मार्क्सवादी/लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते प्रदीप सपाटे आणि गणेश सपाटे यांनी आरोग्य केंद्रात जाऊन संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता अधिकाऱ्यांची धांदल उडाल्याचे दिसून आले. माकपच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारल्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व साहित्य पुन्हा कार्यालयाच्या गोदामात नेऊन ठेवले आहे. अधिकाऱ्यांनी कोणतीही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता जुने साहित्य अत्यल्प दराने विक्रीचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून या प्रकरणी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शासकीय कार्यालयातील जुने साहित्य लिलाव पद्धतीने विक्री करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली असून त्या अनुषंगाने भंगार विक्रीसाठी काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमावली नुसार प्रक्रिया करण्यात आली नसल्याचे समोर आले असून शासकीय अधिकाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली करत जुने साहित्य विक्रीचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. या प्रक्रियेसाठी वृत्त पत्रात जाहिरात देणे आवश्यक असून ६ जून रोजी हा प्रकार झाल्यानंतर वृत्तपत्रात लिलावाची नोटीस दिल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकरणी शासकीय मालमत्तेची बेकायदेशीर रित्या विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी माकप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असून अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलक पवित्रा घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय मालमत्तेची अत्यल्प दरात शासकीय नियमांची पायमल्ली करून विक्री करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड होत असून अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. याची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांना पगार कमी पडत असल्याचे समजून आम्ही भीक मांगो आंदोलन करून भीक मागून भिकेचे पैसे शासकीय अधिकाऱ्यांना देणार आहोत.
शेरू वाघ, माकप
वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यालयातील जुने साहित्य विक्री करण्यात येणार होते. यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असताना भंगार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याचे काम सुरू होते. याविषयी अधिक चौकशी करून अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येईल.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.श्रीकांत कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी, डहाणू