पालघर : तारापूर येथील औद्योगीकरणामुळे बोईसर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम उभे राहिले असून याविरुद्ध गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सद्यस्थितीत बोईसर व परिसराच्या गावांमध्ये पाच हजार पेक्षा अधिक अनधिकृत घर उभी राहिली असून त्यामध्ये १०० पेक्षा अधिक दुमजली किंवा त्यापेक्षा उंच इमारतींचा सहभाग आहे. पालघर बोईसर महानगरपालिका होण्याच्या मार्गावर असताना अनधिकृत बांधकामाला आश्रय देण्याचे काम राजकीय पक्षांकडून केले जात असून महसूल विभागाने बघ्याची भूमिका घेतली आहे.
बोईसर येथे १९९० च्या सुमारास औद्योगीकरणाला मोठ्या प्रमाणात आरंभ झाल्यानंतर वेगवेगळ्या परिसरात या ठिकाणी काम करणाऱ्या कामगार वर्गाला राहण्यासाठी चाळींचे साम्राज्य पसरले. या चाळी अधिकतर महसूल विभागाच्या जागेवर असून अनेक बांधकाम ही नवीन शर्थीच्या जमिनीवर उभी आहेत. याखेरीस इतर अतिक्रमण झालेल्या वसाहती या गुरुचरण, वन विभागाच्या जमिनीवर असून यापैकी अधिकांश इमारतींना कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी अथवा भोगवटा प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये १०० पेक्षा अधिक अनधिकृत इमारती असून त्यांचे बांधकाम धोकादायक व अपेक्षित सासुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जागेची मर्यादा न राखत (मार्जिन स्पेस मध्ये) करण्यात आले आहे.
महसूल विभागाने काही वर्षांपूर्वी अशा अनधिकृत बांधकामांच्या विरुद्ध काही प्रमाणात कारवाई केली होती. मात्र स्थानीय महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत वसाहती उभ्या राहिल्या आहेत. काही स्थानिक मंडळी व कर्मचारी अशा अनधिकृत घरांकडून दर महिन्याला आर्थिक मोबदला घेत असून यामुळेच अनधिकृत वसाहतीला बोईसर परिसरात पेव फुटला आहे.
यासंदर्भात महसूल विभागाच्या बोईसर मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या कार्यकाळात कोणतेही नवीन अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा त्यांनी लोकसत्ता ला दिला. मात्र यापूर्वी उभारलेल्या अनधिकृत बांधकामाला आपण कायद्यातील मर्यादेमुळे नोटीस बजावू शकत नसल्याची भूमिका मांडली. बोईसर व परिसरात असणाऱ्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध आपण वरिष्ठ कार्यालयाला वेळोवेळी अहवाल दिल्याचे सांगितले.
अतिक्रमणाचे माहेरघर
बोईसर भीमनगर, अवध नगर, आत्मशक्ती नगर, पास्थळ, भैय्या पाडा, धनानी नगर, गणेश नगर, सरावली, यादव नगर, शिवाजीनगर (सालवड), लोखंडी पाडा, थावरपाडा, दांडी पाडा, गधा पाडा व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन शर्तीच्या जमिनीवर व शासकीय जमिनीवर अनधिकृत वसाहती उभ्या राहिल्या आहेत
बांगलादेशी, नेपाळी यांना अभय
बोईसर व परिसरात विविध प्रांतामधील नागरिक अशा अनधिकृत वसाहतींमध्ये निवास करीत असून अनेकांनी या सदनिका खरेदी करण्यासाठी खाजगी कर्ज व नोंदणी केल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे अनेक बांगलादेशी व नेपाळी नागरिकांनी या घरांमध्ये १५ वर्षांपेक्षा अधिक वास्तव्य दाखवून भारताचे नागरिकत्व मिळविले असल्याची माहिती पुढे येत आहे. परराज्यातील अनेक सराईत गुन्हेगार अशा अनधिकृत वसाहतींमध्ये निवास करीत असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास शासकीय विभागांना अपयश आले आहे.
पावसाळ्यानंतर काही काळ महसूल अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या संबंधातील कामात व्यस्त राहिले. बोईसर व तालुक्यात इतर ठिकाणीं असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करण्यात येईल. – रमेश शेंडगे, तहसीलदार पालघर

