पालघर : पालघर जिल्ह्यातील एकूण ८९९ गावांमध्ये लवकरच स्वच्छता सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. या सर्वेक्षणाद्वारे प्रत्येक गावातील स्वच्छतेच्या पातळीचे मूल्यांकन केले जाणार असून त्यानुसार त्यांना गुणांकन दिले जाईल. यामुळे गावांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढेल आणि स्वच्छतेची सवय लागावी यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या राष्ट्रीय उपक्रमासाठी पालघर जिल्ह्यातील ८९९ गावांमध्ये तयारी सुरू असून घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी उभारलेल्या सार्वजनिक सुविधांचा प्रत्यक्ष वापर, परिसराची दृष्यमान स्वच्छता तसेच गावकऱ्यांच्या बदललेल्या मानसिकतेची तपासणी केंद्र शासनामार्फत नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावाने एकजुटीने लोकसहभाग, श्रमदान आणि शाश्वत व्यवस्थापनाच्या माध्यमातून स्वच्छतेचा दर्जा उंचावावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.
धार्मिक स्थळे, शाळा, अंगणवाडी, बाजारतळ आणि सार्वजनिक शौचालये या ठिकाणी स्वच्छतेची स्थिती व्यवस्थित असून वापर सुरू आहे का, हे पाहिले जाईल. कचरा वर्गीकरण केंद्र कार्यरत आहे का, मैला गाळ व्यवस्थापनाच्या सुविधा अस्तित्वात आहेत का, तालुका पातळीवरील प्लास्टिक संकलन केंद्र आणि जिल्हास्तरीय गोबरधन प्रकल्प प्रभावी आहेत का याचेही निरीक्षण केले जाणार आहे. याशिवाय भविष्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्था बचत गट किंवा स्थानिक संस्थेमार्फत सातत्याने सुरू ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींनी केलेल्या शाश्वत उपाययोजनांचाही विचार गुणांकनात केला जाणार आहे.
या सर्व घडामोडींचे परिणाम गावांच्या गुणांकनावर, जिल्ह्याच्या कामगिरीवर आणि पुढे राज्याच्या क्रमवारीवर होणार असल्याने गावपातळीवर गांभीर्याने व सातत्याने प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर नियोजन व समन्वय करत आहेत. पालघर जिल्हा स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तपासणी दरम्यान अटी
स्वच्छता सर्वेक्षणात गावांची स्वतंत्र तपासणी होऊन एक हजार गुणांच्या आधारे जिल्ह्याचे आणि राज्याचे गुणांकन निश्चित केले जाणार आहे. देशभरातील ७६१ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे सर्वेक्षण होणार असून गाव पातळीवर मिळालेले गुण राज्य व देश पातळीवर परिणाम करतील. त्यामुळे गावातील सर्व सुविधा कार्यान्वित असाव्यात, सांडपाणी रस्त्यावर वाहू नये, परिसरात कुठेही घनकचऱ्याचे ढिगारे आढळू नयेत, प्लास्टिक कचरा वर्गीकरण केंद्रात पोहोचवलेला असावा आणि सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता नजरेत भरणारी असावी, अशी अट तपासणीदरम्यान पाहिली जाणार आहे.
सर्वेक्षणाचा गावांवर होणारा परिणाम
आरोग्यात सुधारणा, जीवनमानात वाढ, पर्यटनाला चालना, सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन, सरकारी योजनांचा योग्य वापर हे गावांमध्ये स्वच्छतेची एक मजबूत आणि शाश्वत संस्कृती रुजवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
स्वच्छता सर्वेक्षणामागे महत्त्वपूर्ण उद्दिष्टे
स्वच्छता पातळी निश्चित करणे: प्रत्येक गावातील सध्याची स्वच्छतेची स्थिती काय आहे, हे निश्चित करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये कचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता आणि वापर, तसेच गावातील एकूण परिसर किती स्वच्छ आहे, यासारख्या बाबी तपासल्या जातील.
जागरूकता वाढवणे: स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आणि गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हे देखील एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. सर्वेक्षणामुळे गावातील लोकांना स्वच्छतेच्या विविध पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन मिळेल.
स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे: गावांना गुणांकन दिल्याने त्यांच्यात स्वच्छतेसाठी एक प्रकारची निरोगी स्पर्धा निर्माण होईल. प्रत्येक गावाला आपली स्वच्छता पातळी सुधारून चांगले गुणांकन मिळवण्याची प्रेरणा मिळेल.
शाश्वत स्वच्छतेला प्रोत्साहन: केवळ तात्पुरती स्वच्छता न ठेवता, स्वच्छतेची सवय कायमस्वरूपी लागावी आणि स्वच्छतेचे नियम पाळले जावेत यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरेल.