पालघर: पालघर जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचे अधिनस्त उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील अपील प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी शनिवार १२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पालघर यांचे कार्यालय येथे भूमि लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख,नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

या भूमि लोक अदालतमध्ये जमिन मोजणी प्रकरणे, फेरफार नोंदीचे प्रकरणे, एकत्रीकरण योजनेमधील चुक दुरुस्तीची प्रकरणे व कार्यालयीन इतर तक्रारी अर्जाबाबत कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालविरुध्द किंवा केलेल्या कार्यवाहीविरुध्द जिल्हा अधीक्षक कार्यालयात अपील प्रकरणे प्राप्त होत आहेत. अपील प्रकरणात इकडील कार्यालयाकडून सुनावणीची कार्यवाही पूर्ण होऊन निर्णय पारीत होईपर्यंत जनतेचा वेळ, पैसा व श्रम खर्ची होऊनही पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे अपील प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी भूमि लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पालघर यांच्याकडे दाखल अपील प्रकरणात दोन्ही पक्षकार स्वयंप्रेरणेने अथवा विधिज्ञ यांच्यामार्फत समझोता अथवा तडजोड करण्यास तयार असल्यास त्यांनी तसा लेखी अर्ज जिल्हा अधीक्षक कार्यालयास सादर करावा. असे अर्ज प्राप्त झाल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही होऊन प्रस्तुत दावे विनाविलंब निकाली होणार आहेत. यामुळे पक्षकार यांचे आपापसातील वाद संपुष्टात येतील व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यास मदत होईल.

प्रलंबित अपीलाच्या झटपट निर्णय लागल्याने तोंडी युक्तिवाद, उलटतपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातील. तसेच दोन्ही पक्षकार यांचा वेळ व पैसा याची बचत होऊन उभय पक्षकारांचे समाधान होईल. यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडे जनतेच्या तक्रारी कमी होऊन प्रशासकीय कामात सुलभता येऊन जनतेचे जीवनमान सुकर होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर जिल्हयातील जनतेने या भूमि लोक अदालत कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख,पालघर नरेंद्र पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.