पालघर : ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आणि स्वयं सहाय्यता समूहांना शाश्वत आधार देण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘उमेद’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय बँक व्यवस्थापक कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत बँका आणि उमेद यंत्रणेमधील समन्वय अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ जानेवारी रोजी ही कार्यशाळा यशस्वी झाली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रुपाली सातपुते यांनी महिला बचत गटांना केवळ कर्जपुरवठ्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना खऱ्या अर्थाने उद्योजक बनवण्याचे आवाहन केले. बँकांशी असलेले प्रभावी लिंकेज आणि उमेद यंत्रणेचा समन्वय यामुळे ‘लखपती दीदी’सारखे महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ जी. बी. भूयान यांनी बँक व्यवस्थापकांना उद्योजकता कर्ज आणि रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. यासोबत वन जीपी वन बीसी मॉडेलद्वारे बँकिंग सेवांचा विस्तार, सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेची व्याप्ती वाढवणे, बँक पतपुरवठ्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच्या रणनीती याविषयावर चर्चा करण्यात आली.
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्या शाखा व्यवस्थापकांचा या कार्यशाळेत विशेष गौरव करण्यात आला. बँक लिंकेज, पतपुरवठा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यवस्थापकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा अग्रणी बँकेचे (बँक ऑफ महाराष्ट्र) व्यवस्थापक विशाल वाघ, जिल्हा अभियान व्यवस्थापक रवी बोबडे, राहील शेख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक आणि ‘बँक सखी’ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पालघर जिल्ह्याची उल्लेखनीय प्रगती
कार्यशाळेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल दिसून येत आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत जिल्ह्यातील एकूण २,४९८ स्वयं सहाय्यता समूहांना ९,८१७.२८ कोटी रुपयांचा बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कर्जाचा विनियोग महिला लघुउद्योग आणि व्यवसायांसाठी करत आहेत.
