पालघर : पालघर शहराच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्थान दिले गेल्याने भाजपामधील कार्यकर्त्यांमधील जुना व नवीन असा वाद चिघळला आहे. तिकीट वाटपामध्ये नवीन सदस्याला झुकते माप दिले गेल्याने पक्षाच्या प्रचारामध्ये जुन्या मंडळींनी विशेष सहभाग घेत नसल्याचे दिसून आले आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पालघर जिल्ह्यातील यशानंतर पालघरसह जिल्ह्यातील डहाणू, जव्हार नगरपरिषद व वाडा नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार भाजपाचे पदाधिकारी विचाराधीन होते. अलीकडच्या काळात शिवसेनेतील काही मंडळींना देण्यात आलेला भाजपा प्रवेश तर भाजपामधील काही मंडळींना शिवसेनेत प्रवेश दिला गेल्यानंतर उभयतांमध्ये स्थानिक पातळीवर संबंध अधिक दुरावले गेले होते.
भाजपामध्ये गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले असुन नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रवेश घेतलेल्या मंडळींना तिकीट वाटपात झुकते माप दिले गेले असल्याचे आरोप जुन्या मंडळींकडून केले जाऊ लागले आहेत. शिवाय उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रारूप मतदार यादीत असणाऱ्या त्रुटींबाबत भाजपाचे माजी मंडळ अध्यक्ष यांनी नव्याने प्रवेश केलेल्या दोन माजी नगरसेवकांच्या समवेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेविषयी देखील पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपल्याला विश्वासात न घेतल्याचे कारण सांगून जोरदार वादंग घातला होता.
भाजपाने गतवेळच्या बहुतांश नगरसेवकांना संधी दिली असली तरीही ३० नगरसेवकांमध्ये अनेक नवीन चेहरे समाविष्ट झाल्याने इच्छुक असणाऱ्या जुन्या मंडळींमध्ये नाराजी ओढावली आहे. उमेदवारी निश्चित करण्यासाठी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा व भाजपाचे जेष्ठ नेते बाबाजी काठोळे यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आले होते. तसेच अध्यक्षपदाचे उमेदवारी निवडताना दोन इच्छुक उमेदवारांना डावलले गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान अधिकृत चिन्ह वाटप उद्या २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून देण्यात येणार असले तरीही भाजपाच्या उमेदवारांनी प्रचाराला आरंभ केला आहे. या प्रचारात भाजपाची जुनी मंडळी तसेच आजी – माजी पदाधिकारी यांची उपस्थिती नाममात्र असल्याचे दिसून आले आहे. भाजपाचे विद्यमान पदाधिकारी सामुहिक राजीनामे देण्याबाबत तयारीत असल्याचे खात्रीलयक वृत्त पुढे आले आहे. मात्र भाजपाचे पालघर मंडळ अध्यक्ष भाविन कंसारा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
दरम्यान उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभा डहाणू व पालघर येथे आयोजित करण्यात आल्या असून शिवसेना (शिंदे) पक्षाच्या समोर लढताना एकत्रित भाजपा असे चित्र उभे करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री यांचा दौरा उपयुक्त ठरेल अशी शक्यता आहे. दरम्यान भाजपामधील अंतर्गत धुसफुस मिटवण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी पालघर मध्ये दाखल झाले आहेत. पालघरची निवडणूक अतितटीची होणे अपेक्षित असताना पालघर भाजपा मध्ये एक संघ भावना असल्यास निवडणुकीत अनेक अडचणीला सामोरे जावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पालघर शहरातील काही भाजप कार्यकर्त्यांमध्ये तिकीट वाटपावरून नाराजी निर्माण झाली होती. ती दूर करण्यात आली असून सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकदिलाने प्रचारात कार्यरत झाले आहेत. – डॉ. हेमंत सवरा, खासदार
