बोईसर : पालघर तालुक्यातील नागझरी ते किराट या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे चाळण झालेल्या रस्त्याचे काम नव्याने हाती घेण्यात आले आहे. मात्र रस्त्याचे काम हाती घेताना पर्यायी रस्ता उपलब्ध करून न दिल्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाचा तात्पुरत्या काळासाठी पर्याय मार्ग म्हणून वापर करण्यास परवानगी देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्र संघर्ष समितीमार्फत करण्यात आली आहे.
पालघर तालुक्यातील नागझरी ते किराट या तीन किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याच्या टप्प्याचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नव्याने डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. अवजड वाहनांच्या अती भारामुळे रस्ता खराब होऊ नये याकरिता आयआयटी मुंबईच्या मार्गदर्शनाखाली माती स्थिरीकरण करून त्यावर लहान मोठी खडी, क्रश सॅंडचे थर आणि सर्वात वरती डांबराचा थर अशाप्रकारे रस्त्याला मजबुती दिली जाणार आहे.
मात्र रस्त्याचे काम सुरू असताना या रस्त्यावरील लालोंडे गवळीपाडा, किराट, पवार पाडा, बोरशेती येथील विद्यार्थी, कामगार, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक यांना नागझरी, बोईसर, तारापूर एमआयडीसी परिसरात ये जा करण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था उपलब्ध करून न देण्यात आल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. नागझरी किराट रस्त्याला समांतर जाणाऱ्या आणि सध्या काम जवळपास पूर्ण झालेल्या मुंबई बडोदा या द्रुतगती महामार्गाचा तात्पुरत्या काळासाठी पर्यायी मार्ग म्हणून वापर करून देण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी स्थानिक भूमिपुत्र संघर्ष समितीतर्फे पालकमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
नागझरी ते किराट या रस्त्याचे गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाळ्याच्या तोंडावर नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे या रस्त्याची अवघ्या महिनाभरातच चाळण झाल्याने रस्ते कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पालघर तालुक्यातील नागझरी – किराट- चिंचारे हा बोईसर ते चिल्हार फाटा या राज्य मार्गाला जोडणारा ग्रामीण भागातील महत्त्वाचा मार्ग आहे.
लालोंडे, बोईसर येथील शाळा आणि विद्यालयात शिक्षण घेणारे शालेय विद्यार्थी, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये ये जा करणारे कामगार वर्ग, सामान्य नागरिक यांच्यासाठी अतिशय सोयीचा रस्ता आहे. त्याचप्रमाणे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी किंवा आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्ग म्हणून अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर केला जातो. या परिसरात असलेल्या दगड खाणी आणि क्रशरमधून क्षमतेपेक्षा अधिक २५ ते ३० टन वजनाच्या गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असल्याने रस्त्याची चाळण झाली.

