पालघर : पालघर शहरातील टेंभोडे रस्त्यावर निलसृष्टी अपार्टमेंट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यादरम्यान रस्त्याच्या कामाला आरंभ झाल्याने शहरात विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. नगरपरिषदेने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे तसेच काही रस्त्यांना हंगामी पद्धतीने एक दिशा मार्ग करणे आवश्यक झाले आहे.
टेंभोडे रोड वरील निलसृष्टी अपार्टमेंट पासून डॉ. आंबेडकर चौकापर्यंतच्या ५५५ मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला ३.४० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून ८ जानेवारीपासून या रस्त्यावरील वाहतूक महिनाभराच्या कालावधीसाठी बंद करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे या रस्त्याचे भूमिपूजन २० जानेवारी रोजी होऊन प्रत्यक्षात काम २६ जानेवारी रोजी सुरू करण्यात आले होते.
या रस्त्याच्या दरम्यान डांबरी रस्त्यासह सुमारे ४० टक्के असणारा रस्त्याचा काँक्रीट भाग फोडून उघडण्यात येणार असून त्या ठिकाणी नव्याने काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यामुळे डॉ. आंबेडकर चौकाकडून पालघर रेल्वे स्टेशन कडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. असे करताना साईनगर येथील जोडरस्ता तसेच होली स्पिरिट शाळेकडून सुखसागर अपार्टमेंट पर्यंतचा जोड रस्त्याचा वापर करण्याचे सुचवण्यात आले आहे. या पर्याय सुचवलेल्या दोन्ही जोड रस्त्यांवर देखील समोरासमोर येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ लागली असून या दोन रस्त्यांना वेगवेगळ्या दिशेने एक दिशा मार्ग करणे आवश्यक झाले आहे.
दरम्यान रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वृंदावन पार्क मधून साईनगर कडे जाणारे मार्ग उपलब्ध असून तो हंगामी पद्धतीने खुला करून देणे आवश्यक झाले आहे. तसेच रामकृष्ण गार्डन येथून ट्विंकल स्टार, खानपाडा कडे जाणाऱ्या रस्त्याला वाहतूक सुलभतेसाठी तयार करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन रस्त्याचे काम सुरू करताना विद्यार्थ्यांना शाळांकडे जाण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून काम सुरू असलेल्या भागातून एका दिशेने वाहतूक सुरू ठेवल्यास नागरिकांना सुलभ होईल असे दिसून आले आहे.
दरम्यान रस्त्याच्या कामामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये होणारी वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले असून पोलिसांमार्फत हे नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरीदेखील परिसरात झालेल्या अतिक्रमण व बेशिस्त वाहन चालकांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाहतूक कोंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शहरात विकास कामे हाती घेताना नागरिकांना किमान गैरसोय व्हावी या दृष्टीने संबंधितांनी नियोजन करायला हवे अशी भावना पुढे येत आहे.
टेंभोडे ते महाविद्यालय रस्ता खुला करावा
गेल्या काही दिवसांपासून टेंभोडे मराठी शाळा ते सोनोपंत दांडेकर महाविद्यालय दरम्यान जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. बोईसर व महाविद्यालयकडे जाणारे वाहतूक मुख्य रस्त्यावरून जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

