नीरज राऊत
पारंपरिक भातशेतीमधील मर्यादित उतपन्न पाहता जिल्ह्यातील कृषिप्रधान संस्कृती कायम ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकांपासून वेगवेगळे प्रयोग केले आहेत. या प्रयोगांना संमिश्र यश लाभले असून भातशेती तंत्रज्ञान अद्यावत करणे तसेच या भागातील बळीराजाला पर्यायी पिकाची जोड देण्याची गरज अजूनही कायम आहे.
जिल्ह्यात अजूनही 70 ते 75 टक्के भातशेती केली जात असून नारळ, सुपारी, आंबा, चिकू व भाजीपाला लागवड ही या जिल्ह्याचे कृषी क्षेत्रातील प्रमुख उत्पादने होती. 90च्या दशकात मसाले पीक, व्हॅनिला लागवडीच्या प्रयोगांसोबत टोमॅटो, काकडी, कारली, गलका, कोहळी, शिराळे, दुधी, भेंडा, गवार, वांगी व इतर भाजीपाला लागवडीकडे शेतकरी वळू लागले. गेल्या 15 वर्षांपासून शिमला (भोपळी/ढोबळी) मिरची उत्पादनाने संपूर्ण डहाणू तालुक्यातील परिसर काबीज केला. सध्या या भागातील तिखट मिरची व सिमला मिरची हे राज्यासह गुजरात, दिल्ली येथील बाजारपेठांवर साम्राज्य गाजवत आहेत. अधिक उत्पादन देणाऱ्या शिमला मिरचीच्या रोपांना या भागातील लांबणाऱ्या पावसामुळे जमिनीतील दमटपणा बुरशीजन्य रोगाला आमंत्रण देणारा होता. त्यावर उपाय म्हणून जंगली मिरची रोपांच्या दोन अडीच मिलिमीटर व्यासाच्या खोडावर हायब्रीड मिरचीचे रोपे बनवण्याचे तंत्रज्ञान चिंचणी-वाणगाव येथील भानुदास, रामचंद्र व अशोक सावे या बंधूंनी विकसित केले. त्याचा प्रसार परिसरात झाल्याने शेडनेटमध्ये शेकडो एकरवर मिरची लागवड होत आहे. सद्य:स्थितीत डहाणू तालुका हा भाजीपाला उत्पादनाचे मोठे केंद्र आहे.
जव्हार भागातील जमिनीवर हळद लागवडीचा प्रयोग काही वर्षांपुरता मर्यादित राहिला. त्यानंतर या भागात मोगरा लागवडीकडे अनेक स्थानिकांनी लक्ष वळवले असून त्याला चांगले यश मिळाले आहे. वसई व पालघर भागातील कागडा, नेवाळी, चाफा व गुलाब अशा फुलशेतीला झेंडू लागवडीचे बळ लाभले असून वाणगाव भागात उत्पादित होणाऱ्या ऑर्किड फुलांनी मुंबई फुलमार्केटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. याखेरीज शेवंती, बिजली, कागडा, गोंडा या फुलांची देखील या भागात फुलशेती होताना दिसून येत आहे. भौगोलिक मानांकन मिळालेल्या वाडा कोलमच्या बरोबरीने वाडय़ाच्या शेतकऱ्यांनी टरबूज (किलगड) लागवडीत मुसंडी मारली आहे. वेगवेगळय़ा प्रजातीच्या किलगड लागवडीसोबत वेगवेगळय़ा रंगाचे तसेच आकाराचे किलगड तयार करण्याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. डहाणू भागात स्ट्रॉबेरी लागवड किफायतशीर ठरल्यानंतर स्ट्रॉबेरीची लागवड जव्हार-मोखाडा भागातदेखील होऊ लागली असून बटाटा लागवडीच्या प्रयोगाकडे शेतकरी लक्ष केंद्रित करू लागले आहेत.
चिकू फळ प्रक्रियेसोबत आंबा प्रक्रियेकडे येथील शेतकरी वळले. पपई, सफेद व लाल जांब लागवड असणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. बहाडोलीचा जांब व रत्नागिरी येथील काजू कलमाची जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात लागवड होत असून नारळ, सुपारीच्या सोबतीने या लागवडीचा शेतकऱ्यांना काही वर्षांनी लाभ मिळणार आहे. याच बरोबरीने नवीन प्रजातींच्या केळी लागवड करण्यात येत आहे. पारंपरिक रब्बी हंगामातील भाजीपाला लागवडीला बगल देऊन बारामाही भाजीपाला लागवडीकडे अनेक शेतकरी वळले आहेत. त्या सोबत ब्रोकोली, आईबर्ग, लेपटय़ूस, बकचाव, लाल कोबी, चायनीज कोबी, ब्राईलसारखा एक्झॉटिक भाजीपाला या भागात पिकवला जात आहे. हरभरा, तीळ व शेंगदाणा या पारंपरिक रब्बी पिकांसह काळा भात, काळा तीळ लागवडीचे प्रयोग हाती घेण्यात आले असून करटोली व पावसाळय़ात उगवणाऱ्या रानभाज्यांचे उत्पादन घेऊन त्याद्वारे शेतीमधील विविधता साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चिंचणी येथील सावे कुटुंबीयांसह दिवंगत अनंत नाना राऊत (माहीम), यज्ञेश सावे (बोर्डी), अनिल पाटील (सांगे) यांच्यासह इतर काही शेतकऱ्यांनी केलेले वेगवेगळे तसेच अनिल पाटील (पालघर) यांनी नैसर्गिक (ऑरगॅनिक) शेतीचे प्रयोग यांची शासनाने दखल घेऊन त्यांना कृषीभूषण पुरस्काराद्वारे सन्मानित केले आहे. कोसबाड कृषी विकास केंद्र, माहीम विविध सहकारी संस्था, वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ (सांगे), चिकू उत्पादक संघ यासारख्या कृषी संबंधातील संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान या प्रयोगशीलतेमध्ये असून कृषी विभागाने या कामात नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. असे असले तरीही कृषी विद्यापीठ शरत्रज्ञांचा कृषी प्रयोगांमधील सहभाग मर्यादित राहिल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात हाती घेण्यात आलेले कृषी प्रयोग हे एखाद्या योजनेपुरते किंवा महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या कार्यकाळापुरती मर्यादित राहिल्याचे दिसून आले आहे. अशा प्रयोगांमधील उत्पादनावर प्रक्रिया व मार्केटिंगची जोड कालांतराने कमी झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. आधुनिकीकरण आणण्यासाठी शासन प्रोत्साहन देत असले तरीही शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक मदत पोहोचविण्यास विद्यापीठ व शासकीय यंत्रणेमध्ये उदासीनता दिसून आली आहे. नवीन पिढी शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत असले तरीही आधुनिक शेती करण्यासाठी पुरेशा प्रमाणात अर्थसाहाय्य मिळण्यात अडचणी भेडसावत आहेत.
जिल्ह्यात अजूनही भात शेती ही सर्वाधिक प्रमाणात केली जात असून ही शेती किफायतशीर करण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे. चीन, जपान, इंडोनेशिया इत्यादी भातशेती मधील प्रगत देशांमधील प्रयोग पाहता भात लागवडीसाठी मशीन द्वारे बीज लागवड करून नर्सरी मध्ये रोप तयार करणे व नंतर चांगल्या अवस्थेमधील रोपांची पुनर्लागवड केली जाते. असे बदल जिल्ह्यात अंतर्भूत करण्यासाठी कृषी विभागाने विशेष लक्ष देणे आवश्यक असून तंत्रज्ञानातील बदल सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत सहजगत्या पोचवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम घेणे गरजेची आहे.
