वाडा : आमगाव आश्रमशाळेतील १६ वर्षीय नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने मुख्याध्यापक कार्यालयात सतत बोलावून अश्लील शेरेबाजी करणे, घाणेरडे प्रश्न विचारणे, अन्य मैत्रिणीला दिला जाणारा असा गैरवर्तन केल्याचा आरोप करत शाळेतील मुख्याध्यापकाच्या विरोधात वाडा पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियमानुसार (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमगाव शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले असून, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित मुख्याध्यापक (आरोपी संजय सुखलाल खरुळे) यांनी ऑगस्ट महिन्यापासून विद्यार्थिनीला कार्यालयात वारंवार बोलावून अश्लील, असभ्य वर्तन केले. शाळेच्या मैदानावरही गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या त्रासामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली होती. तिच्या सहमैत्रिणीच्या लक्षात हा ताण आल्यावर चौकशी केली असता, तिने आपल्याला होत असलेला त्रास सांगितला. अन्य विद्यार्थिनींनाही अशाच स्वरूपाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले.
यानंतर वसतिगृहातील महिला कर्मचारी व पालकांच्या मदतीने संबंधित विकृत मानसिकतेच्या मुख्याध्यापकाविरोधात वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पालकांनी आश्रमशाळेतील हा घडलेला प्रकार संतापजनक असुन घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यामुळे शाळेतील सुरक्षिततेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी सांगितले की, तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू असून मुख्याध्यापकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच आवश्यक कारवाई केली जाईल. वाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
