मत्स्यव्यवसाय विभागाकडे मनुष्यबळ व अत्याधुनिक साधनांचा अभाव

निखिल मेस्त्री

पालघर : पर्ससीन नौकांना पालघर जिल्ह्य़ाच्या समुद्री मासेमारी क्षेत्रामध्ये बंदी असतानाही या नौका  घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करीत आहेत.  त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे नुकसान होत आहे.  मत्स्य विभागाकडे आवश्यक मनुष्यबळ आणि अद्ययावत यंत्रणा नसल्यामुळे  या पर्ससीन नौकांवर कारवाई करणे शक्य होत नाही, अशी हतबलता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याच्या १२ नौटिकल मैल समुद्री मासेमारी क्षेत्रात परजिल्ह्याच्या व परराज्याच्या पर्ससीन नौका घुसखोरी करून मासेमारी करीत आहेत. याचा परिणाम स्थानिक मच्छीमार बांधव व व्यावसायिक यांच्यावर होत आहे. ज्यावेळी या नौका या क्षेत्रात स्थानिक मच्छीमारांना निदर्शनास येतात, त्यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाकडे तक्रारी करण्यात येतात. परंतु कारवाई करण्यासाठी मत्स्य विभागाकडे स्पीड बोट, मनुष्यबळ व इतर अद्ययावत यंत्रणाच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना स्थानिक मच्छीमारांच्या बोटीतून कारवाईसाठी जावे  लागते. मात्र, स्थानिक बोटी अतिजलद वेगाच्या नसल्याने घटनास्थळावर पोचण्याआधीच पर्ससीन नौका फरार होतात. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाच्या हाती काहीच लागत नाही व बेकायदा नौका कायद्याच्या कचाटय़ातून सहजपणे सुटतात. अशा घटना येथे वारंवार घडत आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाच्या नामुष्कीमुळे बेकायदा पर्ससीन मासेमारीला वाव मिळत आहे व स्थानिक मच्छीमार संकटात सापडत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून पर्ससीन नौका राज्य हद्दीत येत असल्याच्या अनेक तक्रारी मत्स्यव्यवसाय विभागाकडे करण्यात आल्या आहेत. अलीकडच्या काळात एका कारवाईदरम्यान पर्ससीन नौकांनी पळ काळताना समुद्रात सोडून दिलेली जाळी मत्स्य विभागाने जप्त केली होती व त्यातील माशांचा लिलाव केला होता. ही कारवाई सोडल्यास  कुठलीही कारवाई अद्याप झालेली दिसून येत नाही. 

पर्ससीन नौका घुसखोरी करीत असल्याची माहिती मिळाली होती. मत्स्यव्यवसाय विभागाच्या सह आयुक्तांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता पुन्हा तसाच प्रकार सुरू असेल तर तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाला लागणारी सर्वोतोपरी मदत करण्याची तयारी आहे. चर्चा करून आराखडा सादर करायला सांगतो.

डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर

स्थानिक मासेमारी क्षेत्रात पर्ससीन नौका घुसखोरी केल्याची माहिती दिल्यानंतरही मत्स्यव्यवसाय विभाग कासवगतीने कारवाईची प्रक्रिया राबवते. त्याचा गैरफायदा घेत बेकायदा नौका येथे मासेमारी करून पलायन करत आहेत. मत्स्यव्यवसाय विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून मच्छीमारांना संकटात लोटत आहे.

जयकुमार भाय, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार सहकारी संघ

विरोध केल्यास प्रतिहल्ला

पर्ससीन नौका जिल्ह्य़ाच्या हद्दीत आल्यास स्थानिक मच्छीमार त्यांना विरोध करताना त्यांना हुसकावून लावतांना दोघांमध्ये संघर्ष होतो. यामध्ये पर्ससीन नौकेमधून हल्ला करण्याचे प्रकार घडतात. त्यामध्ये मच्छीमार जखमी झाल्याच्या घटनांची नोंदही आहे.   दोन-तीन दिवसांपूर्वी अशाच पर्ससीन नौकांनी पालघरच्या टेंभी व केळवे – माहीम समोरच्या समुद्रात ६ ते ७ नोटिकल अंतरावर  मासेमारी बोटीच्या रडारवर (जीपीएस) या बेकायदा नौका आढळून आल्या होत्या. स्थानिक मच्छीमारांच्या बोटी पाहून त्यांनी पळ काढला होता.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध कार्यालयांना कारवाई करणे सोपे व सुलभ जावे, यासाठी केलेल्या शासन निर्णयातील काही बाबी सुधारित करून अतिजलद बोटींसह विविध सुविधांसाठीचा प्रस्ताव मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी सादर केलेला आहे.

अतुल पाटणे, आयुक्त, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग