सोमटा, चिंचपाडा, कोल्हाण, चारोटी आदी गावांमधून जाणाऱ्या महामार्गावरील पूल मात्र पूर्ण

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रमुख गावे, पेट्रोल पंप, हॉटेल अशा विविध ठिकाणी सेवा रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. वाहनचालक सेवा रस्त्यांवर आल्यास त्याला पुढील अपूर्ण रस्त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अचानक समोर रस्ता बंद दिसल्याने वाहन नियंत्रण करताना त्रास होत आहे. तसेच बऱ्याचदा वाहन नियंत्रित न झाल्याने अपघातांची संख्याही वाढली आहे.

महामार्गावर  ठिकठिकाणी उड्डाणपूल व साधारणपणे ३० ते ३५ सेवा रस्ते तयार केले असले तरी त्याचे काम अपूर्ण असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमटा, चिंचपाडा, कोल्हाण, चारोटी, आंबोली, धुंदलवाडी, दापचरी, सूत्रकार, आच्छाड या सर्व महामार्गालगत असलेल्या गावांजवळील पूल पूर्ण असूनही तेथील सेवा रस्त्यांचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. तर काही ठिकाणी अनेक महिन्यांपासून काम बंद आहे.

‘सेवा रस्त्याचे काम हे पूर्ण झालेले नसल्याने वाहनचालकांना दररोज विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चारोटी येथे एशियन पेट्रोल पंपाकडे वळण्यासाठी सेवा रस्ता तयार केला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हॉटेल अल्फाच्या समोरून हा रस्ता सुरू होतो. परंतु पेट्रोल पंपाजवळ रस्ता अपूर्ण आहे. तवा गावाजवळ कोल्हानकडे जाण्यासाठी सेवा रस्ता आहे पण तोही अपूर्ण अवस्थेत आहे. असे अनेक ठिकाणी सेवा रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे वाहनचालक सेवा रस्त्यावर आल्यानंतर त्यांना पुढील अपूर्ण कामांचा अंदाज येत नाही आणि वाहन नियंत्रित न झाल्याने अपघात होत आहेत.

 या राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली करणारी आयआरबी कंपनी मात्र फक्त टोल वसुलीचे काम करताना दिसत आहे. या अपूर्ण सेवा रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. टोल प्रशासनाशी संपर्क साधला  असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तरी लवकरात लवकर या अपूर्ण सेवा रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी वाहनचालक तसेच परिसरातील नागरिक करत आहेत.