बोईसर : तारापूर एमआयडीसीच्या वाहिन्यांमधून रासायनिक सांडपाण्याची गळती होऊन जलप्रदूषण होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. रासायनिक सांडपाणी गटारे आणि नाल्यांद्वारे थेट खाडी आणि समुद्रात जाऊन मिसळत असल्याने जलप्रदूषण होऊन मासे मृत्यूमुखी पडण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप मच्छीमारांकडून केला जात आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि लगतच्या सरावली, कोलवडे, कुंभवली, सालवड, पास्थळ, खैरापाडा परिसरात औद्योगिक सांडपाण्यामुळे होत असलेल्या जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही उद्योगांकडून रासायनिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावली जात असल्याच्या तक्रारी होत असतानाच एमआयडीसीच्या सत्तर बंगला परिसरातील भुयारी वाहिनीच्या चेंबरमधून रासायनिक सांडपाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला.

चेंबरमधून बाहेर पडत असलेले सांडपाणी रस्त्यावर पसरून उघड्या गटारांद्वारे नाल्यामध्ये जाऊन मिसळत होते. नाल्यांमधील हेच रासायनिक सांडपाणी पुढे मुरबे खाडीद्वारे अरबी समुद्राच्या पाण्यात मिसळते. तसेच सांडपाणी थेट जलस्त्रोतांमध्ये मिसळत असल्यामुळे विहिरी, कूपनलिकांचे पाणी दूषित होत आहे. शेती-बागायती यांच्या नापिकीसोबतच समुद्रातील मासे आणि इतर जलचर मृत्युमुखी पडण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. यामुळे शेतकरी व मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. एमआयडीसीची औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या भुयारी वाहिन्या अनेक ठिकाणी नादुरुस्त होऊन त्यातून सांडपाण्याची गळती होत असल्याने कामगार आणि औद्योगिक क्षेत्रालगतच्या रहिवाशाना दुर्गंधी सहन करावी लागत आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक, औषध निर्मिती, कीटकनाशक निर्मिती, कापड आणि पोलाद यांवर प्रक्रिया करणारे जवळपास १२०० उद्योग कार्यरत असून यापैकी रासायनिक सांडपाणी निर्माण करणारे लाल व नारिंगी वर्गातील एकूण जवळपास ४५० उद्योग आहेत. या कारखान्यांतील रासायनिक सांडपाणी भुयारी गटाराद्वारे प्रक्रिया करण्यासाठी नवीन सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पाठवले जाते व त्यानंतर प्रक्रिया करून नवापूर जवळील समुद्रात ७.१ किमी आतपर्यंत सोडले जाते, अशी माहिती देण्यात येते.

तारापूर एमआयडीसी परिसरातील औद्योगिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या व त्यांच्या चेंबरमधून सांडपाण्याची गळती होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून वाहिन्यांची दुरुस्ती करण्याबाबत एमआयडीसी कार्यालयाला पत्राद्वारे कळवून अहवाल मागविण्यात आला आहे. राजू वसावे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर.