scorecardresearch

मिरचीवर किडीचा हल्ला, ६० कोटी रुपयांचे नुकसान; जिल्ह्यातील शेतकरी हतबल

बागायतदारांचे किमान ६० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.   

pg chilli
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नीरज राऊत

पालघर : डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यातील असलेल्या सुमारे ४२०० एकर क्षेत्रफळावर असलेल्या मिरची लागवडीवर थ्रिप्स, माईट्स, व्हाइट फ्लाय (सफेद पाखरे) या उपद्रवी किडय़ाचा हल्ला झाला आहे. यामुळे उत्पादनात निम्म्यानी घट होण्याची शक्यता आहे. येथील बागायतदारांचे किमान ६० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.   

पालघर जिल्ह्यात १९३८ हेक्टर क्षेत्रफळावर मिरची लागवड केली जाते.  त्यापैकी डहाणू व पालघर तालुक्यात १३५९ हेक्टरचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात तर इतर ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात मिरचीच्या रोपांची लागवड करण्यात आली. या हंगामातील मिरची उत्पादन मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या मध्यापर्यंत उत्पादन सुरू असते. यंदाच्या हंगामामध्ये सुरुवातीपासूनच उपद्रवी किडय़ांचा हल्ला झाला आहे. मिरचीच्या फुलांत बारीक थ्रिप्स, कोळी, सफेद पाखरे राहत आहे. जैविक तसेच रासायनिक कीटकनाशक फवारणीनंतरदेखील ती मरत नाहीत. डहाणू तालुक्यातील वाणगाव भागातील अनेक शेतकऱ्यांना लागवडीच्या काळात दोन खुडे (वेचणे) देखील मिळाले नाही. एकरी १५ ते २० टन उत्पादन देणाऱ्या मिरचीचे उत्पादन एकरी तीन ते पाच टनांवर मर्यादित राहील, अशी परिस्थिती आहे.

बहुतांश शेतकऱ्यांचे एकरी दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय पीक वाचवण्यासाठी केलेल्या फवारणीचा अतिरिक्त खर्च त्यांच्या माथी पडला आहे. जिल्ह्यातील उत्पादकांचे किमान ६० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची स्थिती आहे. मात्र याबाबत  शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त झाली नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून कृषी अधिकारी व शास्त्रज्ञ यांचा पाहणी दौरा आयोजित करू, असे ते  म्हणाले.  

तापमान कमी ठेवण्याचे आव्हान

थ्रिप्स, माईट्स, व्हाइट फ्लाय हे किडे मिरचीमध्ये नियमितपणे आढळून येत असले तरी गेल्या काही दिवसांत वातावरणातील तापमान अचानकपणे वाढल्याने  त्यांचा हल्ला अधिक तीव्र झाला आहे. लागवड क्षेत्रात सध्या ड्रीपद्वारे पाणी दिले जात असल्याने लागवड केलेल्या शेडनेटमधील तापमान कमी ठेवण्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. आगामी काळात तापमान कमी ठेवण्यासाठी उपाययोजना आखाव्या लागणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

कीटकनाशक फवारणीचा सल्ला

कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञाने कीटकनाशकांच्या फवारणीचा सल्ला दिला असून ही फवारणी कीड प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरेल, असे सुचवले आहे. त्याचे प्रमाण व्हर्टिसीलियम: १० मिली प्रति लिटर,  एसिटामिप्रिड: ०.५ ग्रॅम प्रति लिटर, इमिडाक्लोप्रिड: ०.५ मिली प्रति लिटर असे आहे.

कारण काय?

  • डहाणू तालुक्यात व विशेषत: वाणगाव भागात अनेक शेतकरी वर्षांनुवर्षे मिरचीचे उत्पादन घेत असून पीक बदल (क्रॉप रोटेशन) होत नसल्याने विषाणूजन्य रोग व किडे-कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.
  • लागवडीनंतर काही शेतकरी कीटकनाशकाच्या आवश्यक मात्रापेक्षा अधिक मात्रेमध्ये फवारणी करतात. त्यामुळे विषाणूची प्रतिकारशक्ती वाढते. कालांतराने विषाणू या औषधांच्या फवारणीला प्रतिसाद देत नसल्याचे दिसते.
  • नामांकित व दर्जा प्रमाणित कीटकनाशके वापरण्याऐवजी लगतच्या काही जिल्ह्यांतून, राज्यांमधून स्वस्त दरातील व अप्रमाणित कीटकनाशकांचा वापर केला जातो.  
  • कृषी विभागाकडून देण्यात आलेला सल्ला झुगारून कीटकनाशक वापराचे वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. त्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव इतरत्र झपाटय़ाने पसरताना दिसतो.

दर्जावर परिणाम

मिरचीच्या एकरी उत्पादनावर परिणाम होण्यासोबत किडे व विषाणूच्या हल्ल्यामुळे तयार होणाऱ्या मिरचीवर रेष किंवा खपली आल्याप्रमाणे दिसून येते. त्याचबरोबर काही ठिकाणी मिरचीवर सुरकुत्या पडणे किंवा मिरची आकसून जाणे असे प्रकारदेखील घडताना दिसून आले आहे.

तालुकानिहाय लागवड

(हेक्टर)

डहाणू: ९९३

पालघर: ३६६

तलासरी: ३३५

वाडा: १२३

विक्रमगड: ४८

वसई: ३३

मोखाडा: २३

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 00:02 IST