ग्रामीण महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ

पालघर : ग्रामीण महाआवास योजनेअंतर्गत विविध त्रुटी व योजनेच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी पावले उचलावीत व पालघर जिल्ह्यतील आवास योजनेची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ग्रामीण विकास यंत्रणेसह विविध अधिकाऱ्यांना केल्या. महाआवास योजनेच्या कार्यशाळेचा शुभारंभ आभासी पद्धतीने मंगळवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राज्यस्तरीय आभासी कार्यशाळाचे उद्घाटन करण्यात आले. भूमिहीन लाभार्थ्यांंना जागा उपलब्ध करून देणे, घरकुलांना १०० टक्के मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे शंभर टक्के वितरण करणे, किमान कालावधीत पूर्ण करून मंजुरी देणे, सर्व मंजूर घरकुले भौतिक व आर्थिकददृष्टय़ा पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे अशी उद्दिष्टे आहेत.

त्याशिवाय ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, डेमो हाऊसची निर्मिती करणे, सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या लाभार्थ्यांचे आधार सीडींग, जॉब कार्ड मॅपिंग, पूर्ण करणे, शासकीय योजनांची कृती संगम करणे तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणे आदी उद्दिष्टे या टप्प्यात पूर्ण करावयाची असून लवकरात लवकर ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच सद्यस्थितीत प्रत्येक तालुक्याचे किती उद्दिष्ट साध्य झाले असून किती उद्दिष्ट बाकी आहे याबाबत सविस्तर आढावा या कार्यशाळा बैठकीत घेण्यात आला. तुषार माळी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सर्व गट विकास अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत या कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तुषार माळी, पालघर जिल्ह्यातील तालुक्याचे गट विकास अधिकारी कार्यशाळेला उपस्थित होते.