बोईसर – मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघातामध्ये कार चालक जखमी झाला आहे. अपघात प्रकरणी कार चालका विरोधात मनोर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुर्वेस येथील हेरिटेज डेअरी समोर सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गुजरात दिशेला जाणारी भरधाव वेगातील फॉर्च्यूनर कार ( बी.आर. 05 पी.बी.5055) चालकाचे नियंत्रण सुटून पुढील अवजड वाहनाला धडकली. या भीषण अपघातामध्ये कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

अपघात इतका भीषण होता की कारचालकाच्या शेजारी बसलेले आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी शिवाजीराव झनझन पाटील, वय (27 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक यश प्रसाद चौधरी, वय (23 वर्षे) हा किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुणे येथून कार ने अहमदाबाद येथे प्रशिक्षणासाठी जात हा अपघात झाला.अपघातास कारणीभूत कार चालकाविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजपटूच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील बालेवाडी क्रीडा संकुल येथे क्रीडा अधिकारी (गट-ब) म्हणून कार्यरत होते. अहमदाबाद येथे प्रशिक्षणासाठी जात असताना मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर जवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सन 2018 मध्ये 53 व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक त्यानंतर सन 2019 मध्ये 54 व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेत सहभागी होताना वैयक्तिक २५ मीटर शूटिंग स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक, सन 2020 मध्ये पुणे येथे झालेल्या मध्य रेल्वे आयोजित चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. त्यांनी राज्यपातळीवरील स्पर्धेसोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.

आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांच्या अपघाती मृत्यूमुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा महामार्गावरील सूर्या नदी पुलाच्या कठड्याला मर्सिडीज कार धडकून दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या 121 किलोमीटर टप्प्याचे व्हाईट टॉपिंग चे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. मात्र महामार्गाच्या नूतनीकरणानंतर देखील अपघातांचे सत्र कायम आहे. वाहनांचा भरधाव वेग, हलक्या वाहनांसाठी असलेल्या मार्गिकातून अवजड वाहनांचा प्रवेश, महामार्गाचा असमतल पृष्ठभाग, अपघात प्रवण ठिकाणी नियंत्रित वेग मर्यादा आणि वाहतूक नियम पाळण्याचे फलक पथदिवे इत्यादी रस्ते सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे प्रामुख्याने अपघात होत आहेत.