scorecardresearch

सायकल योजनेत गैरप्रकार; सायकलसाठी निधी देऊनही शाळांकडून अतिरिक्त पैशाची मागणी

यंदाच्या वर्षी दोन कोटी सहा लाख रुपये खर्च करून ४१२४  लाभार्थीना सायकल वितरण करण्याचे योजिले होते.

irregularities in distribution of bicycles to schoolgirls
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

पालघर :  जिल्हा नियोजन विकास निधीमधून मानव विकासअंतर्गत शालेय विद्यार्थिनींना सायकल वितरणात काही शाळांकडून गैरप्रकार करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय निधीची तरतूद असतानाही शाळेकडून सायकलसाठी अतिरिक्त पैशाची मागणी केली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुलींचे शिक्षण अखंडित राहावे यासाठी ही योजना २०१५ मध्ये अमलात आणली आहे. यंदाच्या वर्षी दोन कोटी सहा लाख रुपये खर्च करून ४१२४  लाभार्थीना सायकल वितरण करण्याचे योजिले होते. मात्र जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी डहाणू व विक्रमगड या दोन तालुक्यांतच या योजनेअंतर्गत सायकलींची खरेदी पूर्ण झाली आहे. तीही  यंदाचे शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना  खरेदीची प्रक्रिया करण्यात आली आहे.  काही ठिकाणी शाळांनी खरेदी केलेल्या सायकलीच्या वितरणापूर्वी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी केल्याने अशा सायकलींचे वितरण प्रलंबित राहिले आहे. विभाग जिल्हा नियोजन विभागाकडून  ऑक्टोबर महिन्यात लाभार्थीच्या सायकलींची प्रत्यक्ष पाहणी व लेखापरीक्षण हाती घेण्यात आले होते. ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन संबंधित विभाग प्रमुखांनी सायकलींचे पुन्हा निरीक्षण करण्याचे व लाभार्थीची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार तपासणी सुरू आहे.  दरम्यान, सायकल वितरण योजनेत होणारे गैरप्रकार लक्षात घेता या पुढील काळात मध्यवर्ती ठिकाणी खरेदी प्रक्रिया केंद्र राबवण्याचा विचार जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आहे. सायकल खरेदी प्रक्रियेत झालेली दिरंगाई व गैरप्रकार याची चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी लाभार्थीच्या पालकांकडून करण्यात येत आहे.

सुमार दर्जाच्या सायकली

या योजनेत नामांकित कंपन्यांच्या सायकलींची खरेदी करणे अपेक्षित असताना त्याऐवजी स्थानीय पातळीवर सुमार दर्जाच्या सायकली खरेदी करण्याचे प्रकार काही शाळांकडून आणि लाभार्थीकडून  घडले असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी ३५००  ते ३८०० रुपये किमतीच्या सायकली खरेदी झाल्याची माहिती पुढे आली आहे. तरीही या प्रकरणात संबंधित दोषीविरुद्ध आजवर कारवाई झालेली नाही.

विद्यार्थ्यांना दिलेली रक्कम शिक्षकांकडे जमा : या योजनेअंतर्गत लाभार्थीला त्यांच्या बँक खात्यात प्रत्येक सायकलीच्या बदल्यात पाच हजार रुपयांचा निधी जमा करण्यात येतो. या योजनेतील सायकल लाभार्थीनी खरेदी करून त्याचे बिल देणे अपेक्षित असते. मात्र लाभार्थीचे पालक पैसे काढून त्याचा स्वत:साठी उपयोग करतील अशी शक्यता निर्माण करून शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक ही रक्कम स्वत:कडे जमा करत असल्याचे दिसून आले आहे.

सायकली धूळखात पडून

डहाणू:  डहाणू तालुक्यातील एका विद्यालयात सायकली धूळखात पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. सायकल खरेदीसाठी विद्यार्थिनींच्या खात्यावर आलेली रक्कम मुख्याध्यापिकेने मागून घेऊन त्यांच्यासाठी सायकल खरेदी केल्या, मात्र प्रत्यक्षात विद्यार्थिनींना या सायकली वाटप करण्यात आल्या नसल्याचे आढळून येत आहे. डहाणू तालुक्यातील कळमदेवी येथील पंकज डाह्याभाई भंडारी कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या चार मुलींना मानव विकास योजने अंतर्गत सायकल खरेदीसाठीचा निधी वाटप करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थिनींच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये निधी वर्ग करण्यात आले होते. हा निधी विद्यालयातील मुख्याध्यापिका यांनी मागूवून घेत विद्यार्थिनींसाठी सायकल खरेदी केली. मात्र खरेदी केलेल्या सायकल विद्यार्थिनींना देण्याआधी विद्यार्थिनींकडून अतिरिक्त १५०० रुपयांची मागणी मुख्याध्यापिका यांनी केल्याची माहिती विद्यार्थिनींकडून प्राप्त झाली आहे. याबाबत शाळेकडे विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

वर्षनिहाय निधीचा तपशील

आर्थिक वर्ष    लाभार्थी संख्या        निधी वाटप    खर्च निधी

२०१५-१६       २०१३                ६०.३९         ६०.३९

२०१६-१७       १८८९                ५६.६७        ५६.६७

२०१७-१८       २०२६                ६०.७८        ६०.७८

२०१८-१९       २१२३                ७४.३          ७४.२७

२०१९-२०       १८९९                ६६.४६        ६६.४६

२०२०-२१       ०                    ०             ०

२०२१-२२       २२०५                ११०.२५        ९८.७५

२०२२-२३       ४१२४                २०६.२

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-02-2023 at 05:41 IST

संबंधित बातम्या