भारताच्या अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीचा प्रवास आणि विज्ञानाची किमया पालघरकरांना जवळून अनुभवता येणार आहे. विज्ञानाप्रती कुतूहल निर्माण करणे आणि प्रात्यक्षिकाद्वारे भावी पिढीला अंतराळ संशोधनासाठी प्रेरित करणे या उद्देशाने पालघर येथे तीन दिवसीय भव्य विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अहमदाबाद येथील ‘स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर’च्या वतीने पालघरमधील सेंट जॉन टेक्निकल अँड एज्युकेशन कॅम्पस येथे १७, १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी मोफत खुले राहणार आहे. या प्रदर्शनात भारताच्या अंतराळ मोहिमांचे जिवंत दर्शन घडवणारे विविध मॉडेल्स आणि माहितीपर दालने असणार आहेत.
केवळ प्रदर्शनच नाही, तर विद्यार्थ्यांमधील कल्पकतेला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी अंतराळ विज्ञानावर आधारित पोस्टर्स तयार करून प्रदर्शनाच्या ठिकाणी जमा करू शकतात. यातील सर्वोत्तम पोस्टर्सना इस्त्रोच्या शास्त्रज्ञांमार्फत निवडले जाईल आणि त्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. एका शाळेतून जास्तीत जास्त २ पोस्टर्स स्वीकारली जातील. विद्यार्थ्यांच्या विज्ञानाविषयक ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी क्विझ स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
प्रवेश सर्वांसाठी खुला व मोफत
हे प्रदर्शन पालघर जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, आयटीआय, इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची मोठी खाण ठरणार आहे. विशेष म्हणजे, अपंग आणि अंध विद्यार्थ्यांसाठीही विशेष सोय करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि विज्ञानप्रेमींनाही या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल.
नोंदणी आणि संपर्क
शाळा आणि महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या समुहासाठी आगाऊ नोंदणी करावी. नोंदणीसाठी https://forms.gle/sZYkVtoze4DqCMyaA लिंकचा वापर करावा. तसेच अधिक माहितीसाठी अशोक मेटी ७८७५३४७१४१, हिरालाल पटेल ९१७३०२०७६२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे प्रदर्शन तिसरा मजला, मुख्य सभागृह, सेंट जॉन टेक्निकल कॅम्पस, वेवूर, मनोर रोड, पालघर (पूर्व) येथे भरणार आहे. पालघर जिल्हा आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
प्रदर्शनातील आकर्षण
उपग्रह आणि रॉकेट मॉडेल्स: इस्त्रोच्या विविध उपग्रहांच्या प्रतिकृती आणि शक्तिशाली प्रक्षेपक वाहनांची माहिती.
ऐतिहासिक मोहिमा: चंद्रयान, मंगलयान आणि भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम ‘गगनयान’ यांची सविस्तर माहिती.
परस्परसंवादी माध्यमे: शैक्षणिक व्हिडिओ, इंटरॲक्टिव्ह डिस्प्ले आणि अंतराळ विज्ञानावर आधारित तज्ज्ञांचे मार्गदर्शन

