जादुगुडा (झारखंड)/ पालघर : देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रम उभारणीत तसेच उत्पादनात सध्या भासणारी युरेनियमची गरज काही प्रमाणात भागविण्यात झारखंडमधील जादुगुडा येथील सात युरेनियम खाणी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसर्या टप्प्यांतर्गत ‘फास्ट ब्रिडर ’पद्धतीच्या अणुभट्ट्यांच्या माध्यमातून वीज उत्पादन सुरू होण्याच्या मार्गावर असून या अणुभट्टीसाठी जादुगुडा येथील युरेनियमचाच वापर केला जात आहे. २०४७ पर्यंत १०० गिगावॉट अणुऊर्जा उत्पादन करून २०७० च्या दशकात देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (यूसीआयएल) योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे.
देशात असणार्या थोरियम या किरणोत्सारी (रेडिओॲक्टिव्ह) मूलद्रव्याचा मुबलक साठ्याच्या अनुषंगाने डॉ. होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली अणुऊर्जा कार्यक्रम तीन टप्प्यांत आखण्यात आला. झारखंड परिसरात असणार्या युरेनियम साठ्यांचा शोध १९५१ च्या सुमारास लागल्यानंतर १९६० च्या दशकात जादुगुडा युरेनियम खाण प्रकल्प हाती घेण्यात आला.
४ ऑक्टोबर १९६७ रोजी अणुऊर्जा विभागांतर्गत ‘यूसीआयएल’ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर झारखंडमध्ये जादुगुडा (१९६८), भाटिन (१९८७), नरवापहार (१९९५), तुरमदीह (२००३), बंदुहुरंग -खुली खाण (२००५), बागजाता (२००८) व मोहुलदीह (२०१५) येथे युरेनियम उत्खनन सुरू करण्यात आले असून जादूगुडा व तुरमदीह येथे खनिजावर प्रक्रिया करण्यासाठी मिल उभारण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशमधील तुम्मालापल्ले येथे युरेनियम खान व त्यावरील प्रक्रिया केंद्र २०१२ च्या सुमारास उभारण्यात आले. सध्या ‘यूसीआयएल’मार्फत दररोज ८५०० टन युरेनियम खनिजावर प्रक्रिया करण्याची क्षमता उभारण्यात आली आहे. या युरेनियम खनिज प्रक्रिया केंद्रांमधून मॅग्नेशियम डाययुरनेट स्वरूपात ‘येलो केक’ संबोधले जाणारे अशुद्ध स्वरूपातील युरेनियम हैदराबाद येथील अणुइंधन संकुलात (न्यूक्लियर फ्युएल कॉम्प्लेक्स) अणुइंधनाच्या उत्पादनासाठी पाठविले जाते.
सद्य:स्थितीत देशामध्ये २४ अणू भट्ट्यांमधून ८.७८ गिगावॉट (८७८० मेगावॉट) अणुऊर्जा उत्पादन होत असून त्यामध्ये आठ अणू भट्ट्यांमध्ये यूसीआयएलमधून उत्पादित केलेल्या युरेनियमचा वापर २४०० मेगावॉट (२७ टक्के) अणुऊर्जा उत्पादनासाठी केला जात आहे.
झारखंडसह आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक व मेघालयात युरेनियम खनिजाचे साठे सापडले असून २०३६ पर्यंत देशातील युरेनियम उत्पादन दुप्पट तर २०४७ पर्यंत चौपट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सद्य:स्थितीत देशामध्ये पुढील ५० वर्षे उपलब्ध राहील इतका युरेनियम खनिजाचा साठा असून युरेनियम उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने तांबे उत्पादन प्रक्रियेतील कचर्यामधून युरेनियमचे अंश विलगीकरण करून उत्पादन करण्यासंदर्भात करारनामा करण्यात आला आहे.
देश ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर्तेकडे वाटचाल करताना अणुऊर्जेच्या माध्यमातून हरित ऊर्जा उत्पादनामध्ये यूसीआयएलचे महत्त्व अधोरेखित होत आहे. यूसीआयएलच्या स्थापनेनंतर सहा दशकांनी, जादुगुडा प्रदेश हा स्वदेशी युरेनियम संसाधने विकसित करण्याच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा अध्याय तसेच औद्योगिक विकास, वैज्ञानिक क्षमता, राष्ट्रीय ऊर्जेची गरज आणि पर्यावरणीय जबाबदारी यांच्यातील एक निरंतर संगम दर्शवत आहे.
स्वदेशीवर भर महत्त्वाचा देशाच्या त्रिस्तरीय अणुऊर्जा उत्पादन कार्यक्रमात स्वदेशी उत्पादित युरेनियमचे महत्त्व अधोरेखित होत यूसीआयएलमधून उत्पादित युरेनियमशिवाय अणुऊर्जा कार्यक्रमातील दुसर्या टप्प्यात प्रवेश करणे शक्य नसल्याचे हैदराबाद येथील अण्विक इंधन संकुलाचे चेअरमन डॉ. कोमल कपूर यांनी जादुगुडा येथील ‘यूसीआयएल’च्या हिरकमहोत्सवी कार्यक्रमात प्रतिपादन केले. २०७० पर्यंत शून्य कार्बन तत्त्वावर आधारित देशातील संपूर्ण वीज उत्पादन करण्याच्या प्रक्रियेत यूसीआयएलचा वाटा महत्त्वपूर्ण असल्याचे यूसीआयएलचे चेअरमन डॉ. के. आनंद राव यांनी नमूद केले.
