बोईसर : जव्हार तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या दाभोसा धबधब्याजवळ उभारण्यात आलेल्या काचेच्या पुलाचे (ग्लास ब्रिज) काम पूर्ण झाले असले तरी त्यावर प्रवेश करण्यास पर्यटकांना सध्या मज्जाव असल्याने धबधब्याचा उंचावरून साहसी अनुभव घेण्यापासून पर्यटक वंचित राहत असून त्यांचा हिरमोड होत आहे.

जव्हार तालुक्यातील नयनरम्य आणि  रौद्रभीषण दाभोसा धबधबा हा  पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हा धबधबा बघण्यासाठी महाराष्ट्रासोबतच शेजारील गुजरात राज्यातील हजारो पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात दाभोसा येथे भेट देतात. पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी अनेक सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत. या सुविधांमध्ये आत्ता नवीन काचेच्या पुलाची (ग्लास ब्रिज) भर पडली आहे. उंचावरील काचेच्या पुलावर उभे राहून पर्यटकांना दाभोसा धबधबा अनुभवण्याचा अधिक रोमांचक आणि साहसी अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. जून महिन्यात काचेच्या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल खुला होण्याची पर्यटक आतुरतेने वाट बघत होते. जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दाभोसा धबधबा पूर्ण भरात वाहत आहे. मात्र नवनिर्मित काचेच्या पुलाचे प्रवेशद्वार सध्या कुलूपबंद असल्यामुळे पर्यटक काचेच्या पुलावर उभे राहून धबधब्याचे आकर्षक मनमोहक रुप पाहण्यापासून वंचित राहत आहेत.

काचेच्या पुलासाठी दोन कोटी खर्च :

पालघर जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारें दोन कोटी रुपयांच्या निधीतून दाभोसा धबधब्या जवळील काचेचा पूल प्रकल्प साकारण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे,अकरा फूट व्यास असलेला गोलाकार भाग आणि  चालण्यासाठी पाच मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर धबधब्याच्या ठिकाणी  आरक्षण कक्ष, कार्यालय, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम व स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

झिप लाईन नवे आकर्षण :

साहसी पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी जव्हार तालुक्यातील कासटवाडी येथील खोल दरीच्या ठिकाणी झिपलाईन  प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी एक कोटी २० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, बैठक व्यवस्था, खाद्यसेवा आणि इतर आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. हा प्रकल्प पुढील महिन्याभरात सुरू करण्याचे नियोजन आहे.

जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू रानी जाखड यांनी काही दिवसांपूर्वी दाभोसा धबधब्याला भेट देऊन काचेचा पूल प्रकल्पाची पाहणी केली होती. दाभोसा हे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचे नमूद करत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. यात वाहनतळ, तिकीट खिडकी प्रतीक्षागृह, खानपान सेवा, स्वच्छतागृहे आणि मार्गदर्शक फलकांचा समावेश असणार आहे.

दाभोसा धबधबा जवळील काचेचा पूल प्रकल्पासाठी देखभाल, दुरुस्ती कामे यांची निविदा प्रक्रिया सुरू असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर लवकरच हा प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल. –संजय डोंगरे ,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार