पालघर : निसर्गसौंदर्याने नटलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील मौजे कासटवाडी येथील पर्यटनस्थळावर नव्याने उभारण्यात आलेली ‘झिप लाईन’ दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे. ६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पर्यटकांना ५० टक्के सवलतीच्या दरात या साहसी क्रीडा प्रकाराचा आनंद लुटता येणार असून, वन विभागाने याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
जव्हार वन विभागामार्फत कासटवाडी येथे पर्यटन विकासांतर्गत ही झिप लाईन उभारण्यात आली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त ६ नोव्हेंबरपासून सुट्ट्या सुरू होत असल्याने जव्हार परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यटकांना साहसी पर्यटनाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या उत्पन्नात भर घालणे, या दुहेरी उद्देशाने ही झिप लाईन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत जव्हार वनविभागाचे उप वनसंरक्षक डॉ. सैपून शेख यांनी दक्षिण जव्हारच्या (प्रा.) वनक्षेत्रपालांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जव्हारला भेट देणाऱ्या पर्यटकांना आता निसर्गाच्या सानिध्यात सवलतीच्या दरात साहसी झिप लाईनचा थरार अनुभवता येणार असल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
चाचणी तत्त्वावर सुविधा; सुरक्षेला प्राधान्य
ही झिप लाईन लोकसहभागातून प्रायोगिक तत्त्वावर (Trial Base) सुरू करण्यात येत आहे. निविदेतील अटी व शर्तींचे काटेकोर पालन करून तसेच सुरक्षेच्या सर्व आवश्यक उपाययोजनांची खबरदारी घेऊन ही सेवा चालवली जाईल. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच उपकरणांच्या देखभालीसाठी (Maintenance) सोयीनुसार आठवड्यातून एक दिवस ही झिप लाईन परिरक्षणाच्या कामासाठी बंद ठेवली जाणार आहे.
