पालघर : जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून वादग्रस्त ठरलेल्या २२ मुदत ठेवी पावत्यां (एफडीआर) बनावट असल्याचे स्टेट बँकेने पावत्या बनावट असल्याचे कळविल्यानंतर १० दिवस उलटले तरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही. या बनावट एफडीआर प्रकरणात विभागाची अंतर्गत चौकशी सुरू असून या प्रकरणात पुढील आठवड्यात वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे.
जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात वाडा येथील एका राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या ठेकेदारांनी २२ एफडीआर च्या आधारे काम केल्याचे अवगत झाल्यानंतर या प्रकरणात माहिती मागविण्यात आली होती. या संदर्भात कार्यकारी अभियंता कार्यालयाने एफडीआर देणाऱ्या वाळा येथील स्टेट बँकेकडून या एफडीआर च्या सत्यता पाडताळणी बाबत १२ ऑक्टोबर रोजी विचारणा केली होती.
दरम्यान १७ ऑक्टोबर रोजी वादग्रस्त ठरलेल्या २२ एफडीआर पैकी सुमारे ७५ लाख रुपये किंमतीच्या सहा एफडीआर पावत्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यांच्या टेबल आवरून संशयास्पदरीत्या गहाळ झाल्या होत्या. तर १९ ऑक्टोबर रोजी या सर्व २२ एफडीआर बनावट असल्याचा अहवाल स्टेट बँकेने अहवाल दिल्या नंतर दसरा निमित्त असणाऱ्या सुट्टीच्या दिवशी (ता २०) काही एफडीआर पावत्या परत करण्यात आल्या.
दरम्यान वादग्रस्त ठरलेल्या २२ पावट्यांपैकी सहा पावत्या संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी पळवल्याचा संशय असून या प्रकरणात जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उर्वरित १६ एफडीआर पावत्या अंतर्गत गहाळ झाल्याची माहिती खात्रीला एक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील यांच्यामार्फत अंतर्गत चौकशी सुरू असून चौकशी अहवाल पुढील आठवड्यात वरिष्ठ कार्यालयात सोपवला जाईल असे प्रशांत पाटील यांनी लोकसत्ताला सांगितले.
टेंडर डॉक्युमेंट मधून एफडीआर बाहेर का आल्या?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एफडीआर संदर्भात माहिती मागवल्यानंतर टेंडर डॉक्युमेंटमध्ये जोडल्या गेलेल्या एफडीआर च्या मूळ प्रती संबंधित टेंडर लिपिकाने काढून त्या अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना ठेवण्यासाठी दिल्याची माहिती पुढे आली आहे. एफडीआर परत करण्याच्या कालावधी जवळ नसताना ही कृती संशयास्पद असल्याचे कार्यालयातील अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येत असून या प्रकरणात देखील संबंधित कर्मचाऱ्यांचा सहभागाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान या टेंडर लिपिक यांनी १६ एफडीआय एका अन्य अधिकाऱ्याला दिल्याचे सांगितले जात असून त्यांनी हे एफडीआर नेमके कुठे ठेवले याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने बनावट एफडीआर गहाळ करण्याच्या प्रक्रियेत जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध विभागातील कर्मचारी यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे आरोप करण्यात येत आहे.
सत्यता न पडताळताच एफडीआर स्वीकारले ?
स्टेट बँकेच्या एफडीआर मध्ये ११ अंकांचे क्रमांक असणे आवश्यक असताना अवघ्या सात अंक असणारे एफडीआय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचे या प्रकरणातून निष्पन्न झाले आहे. असे करताना संबंधित कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय चौकशी दरम्यान व्यक्त करण्यात येत असून संबंधितांकडून चौकशी केली जात आहे.
एक हजार कोटींचा संभाव्य घोटाळा?
जव्हारच्या सार्वजनिक विभागाच्या कार्यालयाकडून कामे न करता बनावट बिलाद्वारे देहके अदा करून घेणे, बनावट मुदत ठेवी पावत्या द्वारे विकास कामे करणे, एकाच कामाचे दुबार किंवा तीन वेळा वेगवेगळ्या नावाने देखेदा करून घेणे व इतर प्रकारे गैरव्यवहार झाल्याचे आरोप शिवक्रांती या संघटनेने केले असून या प्रकरणात विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे.
