गटाराच्या दर्जाहीन कामामुळे पदपथावरील पेवर ब्लॉक निखळले

पालघर : पालघर नगर परिषदेमध्ये विविध विकासकामे दर्जाहीन होत असल्याची प्रकरणे उघडकीस येत असताना आणखीन एक विकास काम दर्जाहीन झाल्याचे समोर येत आहे. देवी सहाय रस्त्यावरील एकतर्फी बांधलेले गटार ठेकेदाराने दर्जाहीन बांधल्यामुळे पदपथावरील पेवर ब्लॉकची दुरवस्था सुरू झाली आहे.

दीड ते दोन वर्षांपूर्वी देवीसहाय रस्त्याच्या दुतर्फा समांतर गटाराच्या कामाचे कार्यादेश ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र ठेकेदाराने वेळकाढूपणा केल्याने हे काम धीम्यागतीने सुरू आहे. त्यातच आधी बांधकाम केलेले काम दर्जाहीन आहे. पेव्हर ब्लॉक्स निखळून पडले आहेत. पादचारी वर्गाला चालताना याचा त्रास होतो. रस्त्यापेक्षा गटार उंच बांधणे आवश्यक असताना येथील घाऊक व्यापारी, किराणा दुकानदार, व्यापारी यांच्या सोयीसाठी हे गटार रस्त्याच्या उंची इतकेच बांधले जात आहे. त्यामुळे भविष्यात येथे पाण्याचा निचरा होण्याची शक्यता कमी आहे. याउलट गटारातील सांडपाणी रस्त्यावर येईल अशी शक्यता वर्तविण्यात येते.

हे गटार बांधकाम रस्त्याच्या दोन्ही बाजूला करणे आवश्यक आहे. हे काम  घिसाडघाई सुरू असल्याचे दिसते. यापूर्वीही अशाच प्रकारामुळे बांधलेले हे गटार दर्जाहीन झाले होते. दरम्यान, विद्यमान नगराध्यक्षा व प्रशासन यांनी व्यापारी वर्गाची तोंडी मागणी लक्षात घेत त्यानुसार हे काम करण्याचे ठरवले. त्यांच्या सांगण्यावरून प्रत्यक्ष जागेवर जाऊन हे काम कसे करावे याबाबत माहिती घेऊन त्या बाबी अंदाजपत्रकात अंतर्भूत व बदल केल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

कार्यादेश देऊन बराच काळ लोटल्यानंतरही अजूनही काम पूर्ण झालेले नाही. याचबरोबरीने सद्यस्थितीत पूर्ण झालेले काही गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे संबंधित ठेकेदाराचे देयक थांबवण्याची मागणी नगरपरिषदेच्या सभेत याआधीच केली आहे.

कैलास म्हात्रे, गटनेता, नगर परिषद, पालघर

दुकानदार यांच्या मागणीनुसार प्रत्यक्ष जागेवर पाहणी केल्यानंतरच गटार बांधण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार अंदाजपत्रक आराखडा तयार करण्यात आला.जेथे दर्जाहीन काम आहे तेथे दुरुस्तीच्या सूचना दिल्या जातील.

इंद्रजित सूर्यराव, नगर अभियंता, नगर परिषद, पालघर