पालघर: बोईसर रेल्वे स्थानकालगत असणारे रेल्वे यार्ड बोईसर पश्चिमेला चित्रालय परिसरात स्थलांतरित करण्याच्या काम प्रगतीपथावर आहे. या स्थलांतरामुळे उद्भवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.”पुन्हा समन्वयाचा अभाव” या मथळ्याखाली लोकसत्ता मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या सदर्भात गांभीर्याने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला या विषयी बाजू मांडण्यासाठी सुचित केले होते.
मालवाहू यार्ड चे स्थलांतर केल्याने सध्या खैरापाडा भागात होणारी अवजड वाहने चित्रालय मार्गे जुन्या बीएआरसी गोडाऊन च्या लगत उभारण्यात येणाऱ्या मालवाहू फलाटांकडे होणे क्रमप्राप्त आहे. यामुळे दररोज ८० ते १०० अठरा चाकी अवजड वाहने ही चित्रालय मार्गे नवीन यार्ड कडे येणार असल्याने त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल अशी शक्यता आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याची दिसून आले होते. लोकसत्ता मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर रेल्वे अधिकारी तसेच स्थानिक प्रशासन अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत पुढील आठवड्यात संयुक्त बैठकीचे आयोजन करून रेल्वे यार्ड स्थलांतरामुळे उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याबाबत उपाययोजना करण्यात येतील असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्अयकारी अभियंता यांनी लोकसत्तेला कळवले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही अभीज्ञ
बोईसर चित्रालय परिसरात उभारण्यात येणारा रेल्वे यार्ड हा माल गाड्यांसाठी नसून तो लोकल गाड्या उभ्या करण्यासाठी यार्ड असल्याचे पालघर विभागाच्या एका उच्चपदीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तर संभाव्य वाहतूक सोडवण्याच्या दृष्टीने आयोजित संयुक्त बैठकीला डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर अर्थात समर्पित मालवहू रेल्वे मार्ग व्यवस्थापनाच्या अधिकारी वर्गाला बोलविण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. मात्र माल वाहतुकीचे प्रत्यक्षात कामे पश्चिम रेल्वे मार्फत हाताळणी होत असून मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन मार्फत विरार डहाणू चौपदरीकरणामुळे यार्ड स्थलांतर करणे भाग पडले आहे. त्यामुळे यार्ड स्थलांतर करण्याच्या प्रकल्पाशी डीएफसीसी चा संबंध नसल्याचे अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अजूनही अवगत नसल्याचे या संदर्भात जारी केलेल्या पत्रावरून दिसून आले आहे.
भागधारकाला चर्चेत सहभागी करून घ्यावे
तारापूर येथील टाटा स्टील, जे एस डब्ल्यू स्टील्स, विराज प्रोफाइल्स, करमतारा सारख्या मोठ्या पोलाद उद्योगांकडून रेल्वे मार्गाने मालवाहतूक केली जात आहे. सद्यस्थितीत औद्योगिक वसाहतीच्या दक्षिणेच्या बाजूला स्थित या अधिक तर कारखान्यांकडून एका बाजूने खैरापाडा येथील यार्डात अवजड वाहतूक केली जाते. मात्र बोईसर रेल्वे यार्डाचे ठिकाण बदलल्यास या अवजड वाहनांना एमआयडीसी मधून प्रवास करावा लागणार असून वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीत रेल्वेमधून अवजड वाहतूक करणारे भागधारक (उद्योजक) तसेच एमआयडीसी अधिकाऱ्यांना सहभागी करून घ्यावे अशी मागणी पुढे येत आहे.