डहाणू तालुक्यातील कासा येथे ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान ‘कासा फेस्टिवल २.०’चे आयोजन करण्यात आले आहे. सूर्या नदीकाठी असलेल्या भिसे विद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव पार पडणार असून, सध्या महोत्सवाच्या तयारीने वेग घेतला आहे. पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार असून, यावेळी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कला, संस्कृती आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जात आहे.

या तीन दिवसीय महोत्सवात स्थानिक कलाकारांच्या सादरीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. नृत्य, नाट्य, गायन आणि हास्यविनोद कार्यक्रमांसोबतच लिटल चॅम्प्स फेम राधिका पवार, सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील, बिग बॉस फेम दादूस आणि सुपरस्टार विजेती श्रावणी महाजन यांचे विशेष कार्यक्रम होणार आहेत. तसेच स्थानिक यूट्यूब कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांसाठीचा ‘पैठणी’ हा खेळ आणि लहान मुलांसाठीचे मनोरंजन क्षेत्र हे या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे.

स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी महोत्सवात ७० ते ७५ खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील पारंपरिक शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची रेलचेल असेल. या उपक्रमामुळे केवळ पर्यटनालाच नव्हे, तर स्थानिक व्यावसायिकांना आणि महिला बचत गटांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. कासा व डहाणू परिसरातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांची ओळख राज्याच्या नकाशावर ठळकपणे उमटवण्यासाठी या फेस्टिवलचे नियोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील कलागुणांना हक्काचा मंच मिळवून देणे आणि पर्यटन वृद्धी करणे हा या फेस्टिवलचा प्राथमिक उद्देश असल्याचे आयोजक हरेश मुकणे यांनी सांगितले. डहाणूच्या निसर्गसंपन्न वातावरणात होणाऱ्या या महोत्सवात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमामुळे कासा परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२०२५ मध्ये सुरू झालेल्या महोत्सवाला पहिल्या वर्षी खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. महोत्सवाच्या तिनही दिवशी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. खाद्यसंस्कृती आणि तालुक्याची ओळख दर्शविणाऱ्या या उत्सवामुळे पर्यटनाला देखील चालना मिळत आहे. महोत्सवातील माझ्या आकर्षण हे प्रवेशद्वारापाशी असलेल्या महालक्ष्मी डोंगराचा देखावा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्याहित्सवची जय्यत तयारी सध्या सुरू असून यावर्षी देखील महोत्सवात लक्षवेधी गर्दी उसळणार असल्याची खात्री आयोजकांकडून दिली जात आहे.