डहाणू तालुक्यातील सोमटा गावात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत कासा पोलिसांनी तब्बल २९ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत अफूची सुकलेली बोंडे, चुरा आणि डोडा पावडर यांसारख्या अंमली पदार्थांच्या साठ्यासह तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमटा गावठाण परिसरातील एका घरात अंमली पदार्थांचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी महेन्द्र काशिनाथ गुरोडा (वय ४०, रा. सोमटा), सुनील बियाराम बिष्णोई (वय ३२, मूळ रा. राजस्थान) आणि बाबूलाल शिवशंकर यादव (वय ३६, मूळ रा. उत्तर प्रदेश) या तिघांना अटक केली आहे. आरोपींनी हे अंमली पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपी महेन्द्र गुरोडा याच्या सोमटा येथील राहत्या घरातील एका खोलीवर छापा टाकला असता तिथे मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला. यामध्ये सुमारे ८४.९१५ किलो अफूची सुकलेली बोंडे व चुरा आणि ५८.५९५ किलो डोडा पावडर जप्त करण्यात आली आहे. अंमली पदार्थांसोबतच तीन मोबाईल हँडसेट, रोख रक्कम, एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एक चारचाकी मोटार कार असा एकूण २९.४७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या धडक कारवाईत जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप महेर, कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अमर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यासह महामार्गावर पसरलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

