डहाणूतील ‘कातकरी महोत्सव’ उत्साहात सुरू

एकात्मिक आदिवासी प्रकल्पाने पहिल्यांदाच डहाणू येथे  आयोजित केलेल्या कातकरी महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.

पारंपरिक पोशाख, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डहाणू : एकात्मिक आदिवासी प्रकल्पाने पहिल्यांदाच डहाणू येथे  आयोजित केलेल्या कातकरी महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवातील शुक्रवारच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या महोत्सवात कातकरी समाजाची सांस्कृतिक परंपरा, त्यांच्या वस्तू, खाद्यसंस्कृतीची ओळख दाखविणारी दालने येथे उभारण्यात आली असून मोठय़ा संख्येने नागरिक  येथे भेटी देत आहेत.

शासकीय योजना, आरोग्य विभाग वैद्यकीय तपासणी, कोविड लसीकरण, तसेच कातकरी समाजाच्या महिला बचत गटांनी लावलेली खाद्य, वस्तुविक्रीची दालने (स्टॉल) येथे पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी १२ शासकीय विभाग, १० कातकरी समाजाचे व इतर आदिवासी समुदायांची दालने आहेत. आदिवासी समुदायांचे प्रतीक असलेले घर, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो, वाळू शिल्प आयोजन स्थळी उभारण्यात आले आहे.  या वेळी कातकरी समाजातील २० मुलींना सायकलवाटपाचा कार्यक्रमही करण्यात आला. मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या पालघर व इतर जिल्ह्य़ातील कातकरी समुदाय व इतर नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या महोत्सवाचा शुभारंभ झाला. पालघर जिल्हय़ात सात हजारांपेक्षा अधिक कातकरी कुटुंबे असून या समाजबांधवांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने व रोजगारासाठी त्यांचे होणारे स्थलांतर शासकीय योजनांच्या लाभाने थांबावे यासाठी डहाणू येथे प्रकल्प कार्यालयातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  १३ नोव्हेंबपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.  महोत्सवाचे उद्घाटन आमदार विनोद निकोले,  श्रीनिवास वनगा तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, नगराध्यक्ष भरत रजपूत यांच्या उपस्थित करण्यात आले. नितीन पाटील, आयुक्त मानव विकास संसाधन, आशिमा मित्तल प्रकल्प आधिकारी, दत्तू वाघ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कातकरी संघटना, रमेश सावरा, शांताराम ठेमका हेही उपस्थित होते. जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अमिषा मित्तल यांनी केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katkari mahotsav dahanu enthusiasm ysh